न्यूयॉर्क : जगभरातील अत्यंत प्रतिष्ठित मेट गाला फॅशन शो नुकताच न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या फॅशन शोमध्ये जगभरातील नामांकित सेलिब्रिटी अत्यंत अनोख्या तर कधी चित्रविचित्र कपड्यांमध्ये रेड कार्पेटवर येतात. या फॅशन शोचा रेड कार्पेट सोहळा सर्वाधिक चर्चेत असतो. भारताकडून याआधी अभिनेत्री ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांनी हजेरी लावली होती. यंदा अभिनेत्री आलिया भट्टने मेट गालाच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. यावेळी तिने तब्बल एक लाख मोत्यांनी सजवलेला गाऊन परिधान केला होता. फॅशन डिझायनर प्रबल गुरुंगने हा ड्रेस डिझाइन केला होता. मात्र मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलियासोबत तिथल्या पापाराझींकडून मोठी चूक झाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससाठी पोझ देताना दिसत आहे. डिझायनर प्रबल गुरुंगसोबत जेव्हा ती समोर येते, तेव्हा काही पापाराझी तिला ऐश्वर्या म्हणून हाक मारताना दिसतात. हे ऐकल्यानंतरही आलिया तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवत फोटोसाठी पोझ देते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
परदेशातील पापाराझी हे भारतीय पापाराझींकडून सूड घेत आहेत, अशीही मस्करी नेटकऱ्यांनी केली आहे. कारण नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात भारतीय पापाराझींकडूनही अशीच चूक झाली होती. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमाला हॉलिवूडमधल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तेव्हा पापाराझींनी टॉम होलँड, झेंडाया, गिगी हदीद यांसारख्या सेलिब्रिटींची चुकीची नावं घेतली होती.
Recently when #AishwaryaRai‘s video calling out #Aliabhatt‘s privilege went viral Alia fans were mocking Aishwarya for her acting skills, BO pull, etc ! Now we have nepo ? being called Aishwarya on an international platform like #MetGala2023 ? #KatrinaKaif #DeepikaPadukone pic.twitter.com/wkB9h1cp8h
— ??? ?.? ?️?️ (@Instajustice14) May 2, 2023
काहींना ऐश्वर्यासोबत घडलेल्या घटनेचीही आठवण यावेळी झाली. मेट गालामध्ये एकदा ऐश्वर्यालाही कतरिना कैफ अशी हाक मारण्यात आली होती. त्यामुळे आलिया भट्टसोबत झालेली ही घटना काही नवीन नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. काही युजर्सनी घराणेशाहीवरून टीका करत हा ऐश्वर्याचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.
मेट गालामधील आलियाचा ड्रेस हा तब्बल एक लाख मोत्यांनी डिझाइन करण्यात आला होता. सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरच्या 1992 मधील चॅनल ब्रायडल लूकवरून प्रेरणा घेत हा ड्रेस डिझाइन केला होता. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट कॉस्च्युम इन्स्टिट्यूट या संस्थेकडून हा फॅशन शो आयोजित केला जातो. या फॅशन शोमधून गोळा झालेला निधी हा कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी वापरण्यात येतो.