मुंबई : 8 मार्च 2024 | अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लाडकी लेक राहा कपूरचे फोटो आणि व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतीच ती जामनगरला आई-वडिलांसोबत अंबानींच्या कार्यक्रमात पोहोचली होती. त्यावेळीही तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता जागतिक महिला दिनानिमित्त आलियाने एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा फोटो आणि त्यावरील कॅप्शन वाचून नेटकऱ्यांना राहाविषयी प्रश्न पडला आहे. तर काहींनी आलियाला ट्रोलही करण्यास सुरुवात केली आहे. आलियाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये हाताने बनवलेली एक भेटवस्तू पहायला मिळतेय. लाल रंगाचा हा हार्ट (हृदय) पाहून 16 महिन्यांची राहा शिलाई करू शकते का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
‘माझ्या चिमुकल्या मुलीने माझ्यासाठी हे बनवलंय आणि तो मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करतेय. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. स्वत:चा दिवस साजरा करण्यासाठी आज आणि आयुष्यातील प्रत्येक दिवसातील काही क्षण आवर्जून काढा’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. यामध्ये हार्टच्या आकाराचा शिवलेला कापड पहायला मिळतोय. त्यावरील बारिक शिलाई स्पष्ट पहायला मिळतेय. या फोटोवरून नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
‘राहाला शिलाई करताना येते का? एवढी लहान मुलगी हे कसं बनवू शकते? सहज कुतूहल म्हणून विचारतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘काहीही.. सेलिब्रिटी आहे म्हणून काहीही पोस्ट करायचं का’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘राहा इतकी मोठी झाली का, ज्यामुळे तिला हे सर्व बनवता येतंय’, असाही उपरोधित प्रश्न एका युजरने केलाय. ‘इतकी लहान मुलगी हे सर्व कसं बनवू शकते? आम्हाला वेड्यात काढू नकोस’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल केलंय.
नुकताच आलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर राहासोबतचा पहिला फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये तिचा चेहरा स्पष्ट पहायला मिळतोय. राहा ही हुबेहूब आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलंय. दरवर्षी ख्रिसमसनिमित्त कपूर कुटुंबीय एकत्र येतात. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने रणबीर आणि आलियाने लेक राहाचा चेहरा सर्वांना दाखवला. लंचच्या आधी रणबीर आणि आलिया राहाला घेऊन पापाराझींसमोर आले होते.
राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. गेल्या वर्षी ख्रिसमसपर्यंत रणबीर आणि आलियाने राहाचे कोणतेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नव्हते. त्याचसोबत त्यांनी पापाराझींनाही तिचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली होती. अखेर ख्रिसमसनिमित्त तिला सर्वांसमोर आणून रणबीर-आलियाने चाहत्यांना गोड सरप्राइज दिला होता.