साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी शहर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मात्र तक्रारकर्त्यांनी त्यांची तक्रार मागे घेतल्यानंतर त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 4 डिसेंबरच्या रात्री घडलेल्या घटनेत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या नऊ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अल्लू अर्जुनने घटनेनंतर पीडित कुटुंबीयांची किंवा त्या मुलाची अद्याप भेट का घेतली नाही, असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यावरही अल्लू अर्जुनने या पोस्टच्या माध्यमातून मौन सोडलं आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एम. रेवती या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेजची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘दुर्दैवी घटनेनंतर सतत वैद्यकीय देखरेखीखाली असलेल्या चिमुकल्या श्रीतेजबद्दल मला खूप काळजी वाटतेय. सध्या सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईमुळे मला यावेळी त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटू नका असा सल्ला देण्यात आला आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत. मी त्यांच्या वैद्यकीय आणि कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी घेण्यास वचनबद्ध आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला लवकरात लवकर भेटू इच्छितो’, अशी पोस्ट अल्लू अर्जुनने लिहिली आहे.
अल्लू अर्जुनला जामीन मिळाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आणि नातेवाईकांनी त्याच्या घरी येऊन त्याची भेट घेतली. या भेटीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अल्लू अर्जुनवर टीका केली होती. पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याऐवजी स्वत:च्याच नातेवाईकांना भेटण्यात तो व्यस्त असल्याची टीका काहींनी केली होती. संध्या थिएटरमधील दुर्घटनेप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे शहर पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सेक्युरिटी टीम यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.