सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी निर्मात्यांनी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या टीझरमधील गंगमा तल्ली जत्रेचा सीन पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. या सीनसाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, हे पाहूनच लक्षात येतं. ‘पुष्पा: द राईज’च्या प्रचंड यशानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या सीक्वेलची खूप उत्सुकता आहे. हा सीक्वेल पहिल्यापेक्षा अधिक भव्यदिव्य करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.
‘न्यूज 18’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘पुष्पा 2’मधील गंगमा तल्ली जत्रेच्या अवघ्या सहा मिनिटांच्या सीक्वेन्ससाठी तब्बल 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सीनमध्ये अल्लू अर्जुनचा अभूतपूर्व लूक पहायला मिळतोय. साडी, चेहऱ्यावर विविध रंग, दागदागिने, बांगड्या, नथ, गुंगरू, गळ्यात लिंबांची माळ असा त्याचा हा अवतार आहे. गंगम्मा तल्ली जत्रा ही तिरुपतीमधील प्रचलित प्रथा आहे. दरवर्षी ही जत्रा आठवडाभर साजरी केली जाते. अखेरच्या दिवशी पुरुष महिलांच्या पोशाखात तयार होतात आणि गंगम्माचं रुप धारण करतात. गंगम्मा तल्ली म्हणजेच गंगम्मा आई ही वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी मानली जाते. अल्लू अर्जुनच्या या लूकला मथांगी वेशम असंही म्हणतात.
चित्रपटात या गंगमा तल्ली जत्रेच्या सीनदरम्यान पुष्पराजचा जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स दाखवण्यात आला आहे. जवळपास सहा मिनिटांचा हा सीक्वेन्स असून त्यासाठी निर्मात्यांनी तब्बल 60 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा संपूर्ण सीक्वेन्स शूट करण्यासाठी टीमला 30 दिवसांचा कालावधी लागला. चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने याविषयी सांगितलं, “मी इतकंच म्हणू शकतो की हा खूप मोठ्या बजेटचा सेट होता. संपूर्ण सेट उभारण्यासाठी खूप पैसा खर्च करण्यात आला आहे. निर्मात्यांनी या सीनवर खूप मेहनत घेतली आहे, कारण चित्रपटाच्या कथेसाठी हा सीन खूप महत्त्वाचा आहे. शूटिंगदरम्यान अल्लू अर्जुनची पाठ खूप दुखत होती, मात्र तरीही त्याने शूटिंग पूर्ण केलं.”
‘पुष्पा: द राईज’ या पहिल्या भागाचे ओटीटी हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आती सीक्वेलसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे तिप्पट रकमेची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक सुकुमार यांना ओटीटीच्या या करारातून काही भाग मिळणार आहे. ‘पुष्पा 2’चे डिजिटल हक्क हे तब्बल 100 कोटींना विकले गेल्याचं कळतंय.