हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनची चिक्कडपल्ली पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. जामिनावर सुटलेल्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज (मंगळवार) सकाळी 11 वाजता तो पोलीस ठाण्यात पोहोचला. चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांकडून त्याची कसून चौकशी होणार आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या प्रीमिअरला जेव्हा अल्लू अर्जुन पोहोचला, तेव्हा थिएटरबाहेर चेंगराचेंगरी झाली. त्यात एम. रेवती नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये काय काय घडलं, याविषयी पोलीस अल्लू अर्जुनला प्रश्न विचारत आहेत. या चौकशीनंतर पोलीस त्याला संध्या थिएटरला घेऊन जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल्लू अर्जुन प्रीमिअरला त्याच्या बाऊन्सर्ससह पोहोचला होता. तेव्हा त्याच्या बाऊन्सर्सनी चाहत्यांना धक्काबुक्की केल्याचं समजतंय. याबद्दलही पोलिसांनी अभिनेत्याला सवाल केला आहे. अल्लू अर्जुनच्या चौकशीसाठी पोलिसांनी 20 प्रश्न तयार केले आहेत. जामिनावर बाहेर आलेल्या अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. त्याबद्दलही पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. कारण त्याने ही पत्रकार परिषद नियमांविरुद्ध घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत संध्या थिएटरच्या घटनेवर प्रतिक्रिया दिल्यानंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेतली होती.
#WATCH | Telangana: Actor Allu Arjun reaches Chikkadpally police station in Hyderabad to appear before the police in connection with the Sandhya theatre incident. pic.twitter.com/EjTvyN9eTi
— ANI (@ANI) December 24, 2024