हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एम. रेवती या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेजा अजूनही रुग्णालयात दाखल आहे. घटनेच्या जवळपास महिनाभरानंतर मंगळवारी अभिनेता अल्लू अर्जुनने रुग्णालयात मुलाची भेट घेतली. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (KIMS) याठिकाणी श्रीतेजावर उपचार सुरू आहेत. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी अल्लू अर्जुन पोहोचताच चेंगराचेंगरी झाली. या चेंगरीचेंगरीत रेवती यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा श्रीतेजा अद्याप शुद्धीवर आला नाही.
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. स्थानिक कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. दरम्यान श्रीतेजाला शुद्धीवर येण्यास वेळ लागत असून उपचारांना तो हळू हळू प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अर्जुनच्या भेटीनंतर मुलावर उपचार करणारे डॉ. चेतन मुंदडा आणि डॉ. विष्णू तेज पुडी म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून त्याचा ताप कमी असून त्याला अँटिबायोटिक्स देणंही थांबवलं आहे. नाकाद्वारे त्याला अन्न दिलं जात असून इतर सहाय्यक उपचारही सुरू आहेत. मधे मधे तो डोळे उघडतो आणि अचानक रडतो.”
BREAKING: Allu Arjun finally visits Pushpa 2⃣ Sandhya theatre stampede victim Sri Tej at KIMS Hospital.🏥 pic.twitter.com/Sy99y6q558
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 7, 2025
अल्लू अर्जुनने रुग्णालयात जवळपास दहा मिनिटांपर्यंत मुलाच्या वडिलांशी संवाद साधला. यावेळी त्याने मुलाच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आणि पत्नी रेवती यांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला. मुलाकडून उपचारांना हळूहळू प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भास्कर यांनी अल्लू अर्जुनला दिला. यावेळी अर्जुनने सर्वतोपरी मदत पुरवण्याचं आश्वाासन भास्कर यांना दिलं. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 1’ हा चित्रपट पाहिल्यानंतर श्रीतेजा त्याचा चाहता झाल्याचं भास्कर यांनी सांगितलं. अनेकदा तो घरात ‘पुष्पा द फायर’ असा डायलॉग म्हणत त्याची नक्कल करून दाखवायचा, असंही ते म्हणाले. अल्लू अर्जुनने रुग्णालयात भेट दिली, तेव्हासुद्धा श्रीतेजा बेशुद्धच होता.
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 14 डिसेंबरला त्याला जामीन मिळाला. या घटनेनंतर पोलीस विभाग आणि तेलंगणा सरकार यांनी अल्लू अर्जुनवर विविध आरोप केले आहेत. अल्लू अर्जुन बेजबाबदारपणे वागला, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून त्याने हे आरोप फेटाळले आहेत.