मुंबई- ‘स्टायलिश स्टार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘पुष्पा- द रूल’ या सीक्वेलचं शूटिंग रविवारपासून सुरू झालं. या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर मिरोस्लॉ कुबा ब्रोझेक याने इन्स्टाग्रामवर सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक पहायला मिळतोय. ‘पुष्पा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्याच्या सीक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘साहसाची सुरुवात झाली आहे. आयकॉन स्टारचे आभार’, असं कॅप्शन देत त्याने अल्लू अर्जुनचा फोटो पोस्ट केला आहे. निर्मात्यांना डिसेंबर 2022 मध्ये हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता. त्यामुळे त्याची शूटिंग खूप आधीच सुरू होणार होती. मात्र काही कारणास्तव शूटिंगचं शेड्युल पुढे ढकललं गेलं.
अल्लू अर्जुनच्या या नव्या लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘या आठ महिन्यांची प्रतीक्षा सकारात्मक ठरणार. फर्स्ट लूक पोस्टर पाहण्याची खूप उत्सुकता आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘आणखी एका अविस्मरणीय अनुभवासाठी सज्ज आहोत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
‘पुष्पा: द रूल’ या दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांची जुगलबंदी पहायला मिळणार आहे. पहिल्या भागाच्या अखेरीस फहाद हा या चित्रपटाचा मूळ खलनायक बनला होता. यामध्ये रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका असेल.
ऑगस्टरमध्ये पूजा झाल्यानंतर पुष्पा 2 च्या प्रोजेक्टची सुरुवात झाली होती. दुसऱ्या भागाचं दिग्दर्शनसुद्धा सुकुमारच करणार आहे. मूळ तेलुगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत त्याचं डबिंग करण्यात आलं होतं. पाच विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा अल्लू अर्जुनचा पहिलाच चित्रपट होता.
पुष्पा- द राईज या चित्रपटाने जगभरात तब्बल 300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर हिंदी डबिंग व्हर्जनने 100 कोटींहून जास्त कमाई केली.