मुंबई : अभिनेते आलोक नाथ यांनी त्यांच्या कारकीर्दीत जितक्या भूमिका साकारल्या त्यापैकी बहुतांश भूमिका या बापूजी किंवा वयस्कर व्यक्तीच्या होत्या. ते पडद्यावर या भूमिका इतक्या दमदार पद्धतीने साकारायचे की खऱ्या आयुष्यातही त्यांची ‘ संस्कारी बापूजीं’ची प्रतीमा निर्माण झाली. एकेकाळी ते एकाच वेळी विविध चित्रपटांसाठी शूटिंग करत होते. मात्र आलोक नाथ हे त्यांची ‘संस्कारी बापूजीं’ची प्रतीमा टिकवू शकले नाहीत. अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. ‘मी टू’अंतर्गत आरोपांशिवाय एकदा त्यांच्यावर पायलटसोबत गैरवर्तणूक करण्याचा आरोप होता.
आलोक नाथ यांचा जन्म 10 जुलै 1956 रोजी बिहारमध्ये झाला. त्यांच्या करिअरची सुरुवातच ऐतिहासिक चित्रपटाने झाली. ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट ‘गांधी’ मध्ये त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर ते मशाल, सारांश, मोहरें, कयामत से कयामत तक यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकले. मात्र मोठ्या पडद्यावर त्यांनी वयस्कर भूमिका इतक्या दमदार पद्धतीने साकारल्या की ते संस्कारी बापू म्हणून ओळखले जाऊ लागले.
आलोक नाथ यांनी त्यांच्या कारकीर्दीत हम आप के है कौन, अग्निपथ, हम दोनों, परदेस, आ अब लौट चलें, ताल, हम साथ साथ हैं, कभी खुशी कभी गम, हम तुम्हारे हैं सनम, सोनू की टीटू की स्वीटी आणि दे दे प्यार दे यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या 30 व्या वर्षापासूनच त्यांनी पडद्यावर वयस्कर भूमिका साकारण्यास सुरुवात केली. चित्रपटांसोबतच त्यांनी मलिकांमद्धेही भूमिका साकारल्या आहेत.
आलोक नाथ यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की मद्य सेवनाबाबत त्यांचा अनुभव कधी चांगला नव्हता. रिपोर्ट्सनुसार ते एकदा दुबईत ‘तारा’ या मालिकेच्या स्टार कास्टसोबत शूटिंगसाठी गेले होते. यावेळी त्यांनी नशेत थेट पायलटसोबत गैरवर्तणूक केली होती. त्यांनी पायलटच्या कानशिलात लगावली होती. या घटनेमुळे ते खूप चर्चेत होते.
2018 मध्ये आलोक नाथ यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल करण्यात आला होता. यासोबतच संध्या मृदुल आणि दीपिका अमीन यांनीही आलोक नाथ यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. याप्रकरणी आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला होता. पण तेव्हापासून ते फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहेत.