अभिनेत्री आमला पॉलने (Amala Paul) 2019 मध्ये चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्याचा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी ती करिअरच्या शिखरावर होती. तिची मुख्य भूमिका असलेला आदई हा चित्रपट त्याच वर्षी प्रदर्शित झाला होता आणि त्यापूर्वी ती आणखी दोन चित्रपटांमध्ये झळकली होती. असं असूनही तिने ब्रेक (sabbatical) घेत 2021 मध्ये पुनरागमन केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं.
आमलाने वयाच्या 17 व्या वर्षी नीलतमरा या मल्याळम चित्रपटातून पदार्पण केलं होतं. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या मायना या तमिळ चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतरच्या दहा वर्षांत तिने 32 चित्रपटांमध्ये काम केलं आणि 2019 मध्ये ब्रेक घेतला.
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आमला म्हणाली, “माझे चित्रपट चालत नाहीत किंवा मला ऑफर्स येत नाहीत म्हणून मी ब्रेक घेतला नव्हता. उलट त्यावेळी मला माझ्या करिअरमधील सर्वांत मोठी ऑफर मिळाली होती. पण मी नकार दिला. कारण मला फक्त ब्रेक हवा होता. मी खूप थकले होते, माझ्यात काम करण्याचा त्राणच उरला नव्हता. वयाच्या 17व्या वर्षी मी कामाला सुरुवात केली आणि आता मी 30 वर्षांची आहे. सलग 13 वर्षे मी ब्रेक न घेता काम केलं. त्यादरम्यान मी माझ्या बाबांना गमावलं, कोरोना महामारीचा काळ गेला. इंडस्ट्रीत काम करून मी खूश नव्हते. मला ब्रेकची खूप गरज होती.”
अखेर 2021 मध्ये ‘कुट्टी स्टोरी’ आणि ‘पिट्टा कथलू’ या चित्रपटांमधून तिने पुनरागमन केलं. याशिवाय तिने ओटीटीवरही पदार्पण केलं. ‘रंजीश ही सही’ या हिंदी सीरिजमध्येही ती झळकली. आमला तिच्या न्यूड सीनमुळेही प्रचंड चर्चेत आली होती.