न्यूयॉर्क- अमेरिकेतील अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा ताबा घेताच अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटला रामराम केला. विशेष म्हणजे यामध्ये इलॉन मस्कच्या एक्स-गर्लफ्रेंडचाही समावेश आहे. अभिनेत्री अँबर हर्डने तिचं ट्विटर अकाऊंट डिलिट केलं आहे. काही दिवसांपूर्वी जॉनी डेपविरोधातील मानहानीच्या खटल्यात तिचा पराभव झाला होता. हा खटला जगभरात गाजला.
एका युजरने अँबरच्या ट्विटर अकाऊंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ‘हा अकाऊंट अस्तित्वात नाही’ असं त्यावर पहायला मिळत आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘एक्स बॉयफ्रेंड इलॉननेच तिला अकाऊंट डिलिट करायला सांगितलं असेल’ अशी कमेंट एकाने केली. तर ‘ब्ल्यू टिकसाठी दर महिने पैसे भरणं आता तिला परवडू शकणार नाही’, असं दुसऱ्याने लिहिलं.
जॉनी डेप आणि अँबरची भेट 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द रम डायरीज’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. या दोघांनी 2015 मध्ये लग्न केलं. मात्र लग्नाच्या वर्षभरानंतर दोघं विभक्त झाले. 2017 मध्ये त्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली.
जॉनीपासून विभक्त झाल्यानंतर अँबरचं नाव इलॉन मस्कशी जोडलं गेलं. 2016 मध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र वर्षभरातच त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. त्यानंतर 2018 मध्ये पुन्हा हे दोघं एकत्र आले. मात्र त्यानंतरही दोघांचं नातं काही महिनेच टिकू शकलं.
अँबरशिवाय सारा बॅरीलीस, केन ऑलिन, टोनी ब्रॅक्स्टन यांसारख्या हॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विटरला रामराम केला. तब्बल 44 अब्ज डॉलर्सना कंपनी खरेदी केल्यानंतर मस्क यांनी ‘पक्षी मुक्त झाला’ असं ट्विट केलं होतं. कंपनी ताब्यात येताच मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि कायदा कार्यकारी अधिकारी विजया गाड्डे यांच्यासह चार अधिकाऱ्यांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.