मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : एकीकडे ‘गदर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असताना दुसरीकडे दिग्दर्शिक अनिल शर्मा आणि अभिनेत्री अमीषा पटेल यांच्यातील वाद अद्याप मिटला नसल्याचं दिसून येत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीही अमीषाने दिग्दर्शकांवर काही आरोप केले होते. शूटिंगदरम्यान सेटवर पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या, तंत्रज्ञानांचे पगार रखडले.. असे आरोप तिने दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर केले होते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमीषाने दिग्दर्शकांच्या मुलावर निशाणा साधला आहे. ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओल आणि अमीषासोबत अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्षने मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र त्याच्याऐवजी सर्व प्रसिद्धी तारा सिंग आणि सकिनालाच मिळाल्याचं अमीषा म्हणाली.
“अनेकजण मला दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यासोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. त्यावर मी स्पष्ट उत्तर देऊ इच्छिते. आमचं नातं कधीच चांगलं नव्हतं. ‘गदर 1’च्या वेळीही आमच्यात मतभेद होते. पण माझ्यासाठी ते कुटुंबाचा भाग आहेत आणि नेहमी असतील. कुटुंबातील प्रत्येकजणांचं एकमेकांशी पटतंच असं नाही. पण तरी एक कुटुंब म्हणून आपण सोबत असतो. आमचंही असंच काहीसं आहे”, असं अमीषा म्हणाली.
“अनिल शर्मा यांना ममता कुलकर्णीला सकिनाच्या भूमिकेत घ्यायचं होतं. तर तारा सिंगच्या भूमिकेसाठी त्यांची पसंती गोविंदाला होती. मात्र झी या प्रॉडक्शन हाऊसला सनी देओल मुख्य भूमिकेत हवे होते. झी स्टुडिओज आणि सनी देओल यांच्यामुळेच मी गदरचा भाग बनले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मी त्यांच्याविरोधात जे ट्विट केले होते, ते त्यांनी मला डिलिट करायला लावले. माझ्याकडे त्यांचे चॅट्स पुरावे म्हणून आहेत. त्यांच्या विनंतीमुळे मी ते ट्विट्स डिलिट केले. कारण ते माझ्यासाठी कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहेत”, असाही खुलासा तिने पुढे केला.
अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्माने ‘गदर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दिग्दर्शकांना त्यांच्या मुलाला प्रमोट करायचं होतं, मात्र तारा सिंग आणि सकिनालाच लोकप्रियता मिळाली, असंही अमीषा म्हणाली. पहिल्या दोन भागांप्रमाणेच ‘गदर 3’मध्ये तारा सिंग आणि सकिनाची मुख्य भूमिका असेल तरच मी काम करेन, अशीही अट तिने या मुलाखतीत बोलून दाखवली.