The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’च्या वादावर अमीषा पटेलची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली ‘त्यानेसुद्धा प्रेमाखातर इस्लाम..’

| Updated on: May 19, 2023 | 11:42 AM

चित्रपटात एकाही मुस्लिम व्यक्तीची भूमिका चांगली का नाही दाखवली असा प्रश्न विचारला असता दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले, “आम्ही इथे समतोल साधण्यासाठी नाही आहोत. संपूर्ण देश या समस्येचा सामना करतोय."

The Kerala Story | द केरळ स्टोरीच्या वादावर अमीषा पटेलची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली त्यानेसुद्धा प्रेमाखातर इस्लाम..
Ameesha Patel on The Kerala Story
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : अदा शर्माची मुख्य भूमिका असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जवळपास 170 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. यामध्ये अदासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना कशा पद्धतीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतरण केलं जातं, कशा पद्धतीने त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं, याविषयीची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरून देशभरात वाद सुरू आहे. त्यावर आता अभिनेत्री अमीषा पटेलची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

काय म्हणाली अमीषा पटेल?

अमीषा पटेल सध्या तिच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामध्ये तिच्यासोबत सनी देओलची मुख्य भूमिका आहे. माध्यमांशी संवाद साधताना अमीषा म्हणाली, “समाजातील विविध घटकांना चित्रपटाने एकत्र आणलं पाहिजे आणि त्यांनी एकता, शांती आणि सुसंवाद यांचा प्रचार केला पाहिजे.” यावेळी ‘द केरळ स्टोरी’च्या वादावर बोलताना अमीषाने तिच्या चित्रपटाचं उदाहरण दिलं. “गदरमध्ये एक मुस्लीम महिला हिंदू व्यक्तीशी लग्न करते आणि तरीसुद्धा ती तिचा धर्म विसरत नाही. इतकंच नाही तर सनी देओलने साकारलेल्या तारा सिंग या भूमिकेनंही चित्रपटात त्याच्या प्रेमासाठी इस्लाम धर्म स्वीकारला आहे”, असं ती पुढे म्हणाली.

“आम्ही इस्लामची सेवा केली”

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात सांगितलेला 32 हजार महिलांचा आकडा, धर्मांतर या सर्व मुद्द्यांवरून चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना घेरण्यात येतंय. यावर अखेर दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि निर्माते विपुल शाह यांनी मौन सोडलं आहे. चित्रपटात एकाही मुस्लिम व्यक्तीची भूमिका चांगली का नाही दाखवली असा प्रश्न विचारला असता दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले, “आम्ही इथे समतोल साधण्यासाठी नाही आहोत. संपूर्ण देश या समस्येचा सामना करतोय. जेव्हा आपण दहशतवादाविषयी बोलतो, तेव्हा आपण थेट एका धर्मालाच टारगेट करतोय असा पूर्वग्रह करू शकत नाही. उलट आम्ही इस्लाम धर्माची खूप मोठी सेवा केली आहे.”

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले निर्माते?

आरोपांना उत्तर देताना निर्माते विपुल शाह म्हणाले, “शोले या चित्रपटात गब्बर सिंग खलनायक होता. पण याचा अर्थ असा होत नाही की रमेश सिप्पी साहेब हे सिंग समुदायाच्या विरोधात होते. सिंघम चित्रपटातील खलनायक हिंदू होता. त्याचा अर्थ असा नाही की हिंदू वाईट असतात. मग आमच्या विरोधात असा विचार का? आम्ही तर फक्त अपराधींबद्दल बोलतोय.”