बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते सतत काही ना काही पोस्ट करत असतात. त्याचप्रमाणे ते नियमित ब्लॉगसुद्धा लिहितात. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब हे ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकला बऱ्याच काळापासून एकत्र पाहिलं गेलं नाही. अंबानींच्या लग्नालाही ते दोघं वेगवेगळे आले, म्हणून या चर्चांना आणखी हवा मिळाली. या चर्चांदरम्यान आता बिग बींनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. आयुष्य किती क्षणिक आहे याकडे लक्ष वेधत त्यांनी चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाविषयीची ही पोस्ट लिहिली आहे.
‘मागच्या ब्लॉगमध्ये जो शेवटचा विचार आला होता, तो प्रतिबिंब याविषयीचा होता. हे ‘शेर’ त्याबद्दल सर्वकाही सांगतं. जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहिलं, तेव्हा मी आश्चर्यचकीत झालो. आता मला आरशात जो चेहरा दिसतोय तो काही वर्षांपूर्वी खूप वेगळा होता. प्रत्येक रविवारी मी चाहत्यांना भेटण्यासाठी आतूर असतो. तरी प्रत्येक आठवड्यात मला याविषयी नवल वाटतं की कोणता चेहरा त्यांना जवळचा वाटत असेल? अशा चेहऱ्यालाही त्यांनी खूप प्रेम दिलंय. माझ्या खिडकीबाहेर मला चाहत्यांचे आवाज ऐकू येतात. ते ऐकून मी आशेनं स्वत:ला दिलासा देतो. पण आयुष्य आणि लोकांकडून मिळणारा हा प्रतिसाद यांचा अवधी कमी असतो. आयुष्य कोमेजून जातं आणि संपतं, तसंच लोकांकडून मिळणारं लक्षही एके दिवशी कोमेजून जातं आणि संपतं. या सगळ्यात एक समानता आहे.. हे सर्वकाही शेवटी संपतंच.’
या पोस्टमध्ये बिग बींनी गणेश चतुर्थीचाही उल्लेख केला. ‘गणपतीचा उत्सव सुरू झाला आहे आणि आशीर्वादासाठी देवाची प्रार्थना केली जातेय. देव आपल्या सर्वांना शांती आणि सिद्धी देवो. सर्वांच्या आयुष्यात भरभरून आनंद येवो. कारण आनंद हा अनंत आहे. गणपती विसर्जनासाठी समुद्राजवळ आलेल्या भक्तांचा उत्साह हा सर्वांत मौल्यवान आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून माझ्या चेहऱ्यावरील भावही बदलले’, असं त्यांनी पुढे लिहिलंय.
‘सर्वकाही एकेदिवशी संपतं’ या उल्लेखामुळे बिग बींच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काही जण याचा संबंध बिग बींच्या करिअरविषयी तर काही अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्याविषयी लावत आहेत. अमिताभ बच्चन हे नुकतेच ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. यामध्ये बिग बींनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे.