नुकताच ‘झी युवा सन्मान पुरस्कार 2024’ सोहळा पार पडला. युवावर्ग हा समाजाचं भविष्य असल्याने समाजातील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवकांना शोधून त्यांच्या शिरपेचात झी युवा सन्मान पुरस्काराचा तुरा रोवला गेला. यावर्षी विविध क्षेत्रांतील प्रयोगशील तरूणांना झी युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अशा कर्तबगार तरूणांच्या यादीत अमित ठाकरे यांचाही समावेश झाला आहे. यंदाच्या झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्कारावर अमित ठाकरेंनी आपलं नाव कोरलं आहे. येत्या रविवारी 31 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता झी युवा वाहिनीवर ‘झी युवा सन्मान पुरस्कार’ सोहळा प्रसारित होणार आहे.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे यांनी वडील राज ठाकरेंविषयी वक्तव्य केलं. “माझ्या वडिलांनी मला नेहमी प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. पण अजूनही त्यांनी माझ्यासाठी एक काम केलेलं नाही आणि ते म्हणजे मला एखादा कौतुकाचा मेसेज करणं. मी माझ्या वडिलांचा आदर करतो आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो. पण मला त्यांच्याकडून प्रोत्साहनाचा मेसेज मिळण्याची इच्छा आहे. कदाचित मी अजून म्हणावं तसं काही केलं नसावं. मात्र तो दिवस लवकरच येईल आणि मी त्या दिवसाची वाट पाहीन,” असं अमित ठाकरे म्हणाले.
मनसेच्या विद्यार्थीसेनेच्या अध्यक्षपदापासून अमित ठाकरे यांच्या कामाचा प्रवास सुरू झाला. आजपर्यंत अमित यांनी समाजातील अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांच्या व्यथा समजून त्यांच्यासाठी काम करण्यावर भर दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला असलेलं वलय अमित ठाकरे यांना वारसाने मिळालं असलं तरी आपल्या नेतृत्वगुण आणि वक्तृत्वशैलीने अमित ठाकरे यांनी युवानेते म्हणून ओळख निर्माण केली.
सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे नेते अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थीसेनेच्या माध्यमातून युवकांच्या अनेक समस्यांची उकल करण्यात अमित ठाकरे यांचं मोठं योगदान आहे. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा, रेल्वेप्रवाशांच्या सुविधांसाठी अधिकाऱ्यांशी पाठपुरावा या कामात अमित ठाकरे यांनी त्यांचं नेतृत्वकौशल्य दाखवलं आहे. नेता हा लोकांना आपला वाटला पाहिजे हा मंत्र जपून अमित ठाकरे यांनी राजकारण आणि समाजकारण यांच्यात समन्वय साधला आहे. अमित ठाकरे यांनी याच नेतृत्वगुणाची दखल घेत झी युवा वाहिनीतर्फे त्यांना झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.