एक युग संपलं..; रतन टाटा यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांची भावूक पोस्ट

| Updated on: Oct 10, 2024 | 2:05 PM

रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एक युग संपलं..; रतन टाटा यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांची भावूक पोस्ट
Ratan Tata and Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
Follow us on

उद्योगपती आणि टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित श्रद्धांजली वाहिली आहे. ‘एक युग संपलंय’, असं बिग बी म्हणाले. तर अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रा यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांचं ट्विट-

‘श्री रतन टाटा यांच्या निधनाची बातमी आताच समजली. रात्री खूप उशिरापर्यंत काम करत होतो. रतन टाटा यांच्या निधनाने एक युग संपलंय. ते अत्यंत आदरणीय, नम्र पण अफाट दूरदृष्टी आणि संकल्प बाळगणारे होते. बऱ्याच मोहिमांमध्ये आम्ही एकत्र सहभागी होतो, तेव्हा त्यांच्यासोबत काही अद्भुत क्षण घालवण्याची मला संधी मिळाली होती. त्यांच्याप्रती मी प्रार्थना व्यक्त करतो,’ असं बिग बींनी लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

अनुष्का शर्माची पोस्ट-

‘श्री रतन टाटा यांच्या निधनाची बातमी वाचून खूप दु:ख झालं. त्यांनी त्यांच्या प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणा, आदर आणि शोभा या मूल्यांचं समर्थन केलं. खऱ्या अर्थाने ते भारताचे ‘ताज’ होते. रतन टाटा सर.. तुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुम्ही खूप लोकांचं भलं केलं’, अशा शब्दांत अनुष्काने भावना व्यक्त केल्या.

प्रियांका चोप्राची पोस्ट-

‘तुम्ही तुमच्या दयेनं अनेकांचं भलं केलंत. तुमच्या नेतृत्त्वाचा आणि दयाळूपणाचा वारसा अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. आपल्या देशासाठी तुम्ही जे काही केलंत, त्यासाठी तुमचे आभार. आम्हा सर्वांसाठी तुम्ही एक प्रेरणा आहात. तुमची उणीव जाणवेल’, अशी पोस्ट प्रियांकाने लिहिली आहे.

रतन टाटा यांच्या निधनाने देशातील आदर्श, सभ्य, शालीन व्यक्तीमत्त्वाचा उद्योगपती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक भान जपतानाच टाटा उद्योग समुहाला नेटकं स्वरुप देण्याचं आणि वाढविण्याचं श्रेय रतन टाटा यांचंच आहे. भारतीय उद्योग विश्वातील ‘प्रेमळ, सोज्वळ व्यक्तिमत्त्व’ अशी त्यांची ओळख होती. ‘टाटा म्हणजे सचोटी’ हे समीकरण दृढ करण्यात रतन टाटा यांचा मोलाचा वाटा होता. भारतीय मानसिकतेला साद घालणारा सज्जन उद्योगपती अशी त्यांची ओळख होती.