मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. म्हणून चाहते बिग बी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. बिग बी यांच्यानंतर अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण आजपर्यंत अमिताभ बच्चन यांची जागा कोणीही घेवू शकलेलं नाही. आजही अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी अमिताभ बच्चन प्रचंड मेहनत घेतात. अशात सिनेमांच्या शुटिंग दरम्यान बिग बी अनेकदा गंभीर जखमी झाले होते. एका सिनेमाचं शुटिंग सुरु असताना बिग बी यांचा अपघात झाला होता.
अमिताभ यांच्या अपघाताबद्दल अभिनेता अजय देवगन याने एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. अजय म्हणला, ‘फार वर्षांपूर्वी आमचं काम कठीण होतं, पण आता अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. महानायक अशा काळात ॲक्शन सीन शुट करत होते, जेव्हा सुरक्षेच्या काहीही सुविधा नव्हत्या. तेव्हा ॲक्शन सीन शुट करताना अपघात व्हायचे. कारण तेव्हा सुरक्षेसाठी काही साधन नव्हतं…’
अजय पुढे म्हणाला, ‘अमिताभ बच्चन यांनी अनेक ॲक्शन सीन दिले आहेत, ज्याचा आपण विचार देखील करू शकत नाही. एकदा ॲक्शन सीनसाठी बिग बींनी तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की असं करु नका. हा सीन आपण डिप्लिकेट व्यक्तीकडून करुन घेवू. आम्हाला दोघांना एकत्र उडी मारायची होती. तेव्हा त्यांनी उत्साहात म्हटलं होतं आपण करु…’ असं अभिनेता अजय देवगण म्हणाला होता. तेव्हा देखील सीन शूट करताना अमिताभ बच्चन आणि अजय देवगण दोघे जखमी झाले होते.
दरम्यान, ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान देखील अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता. ॲक्शन सीन शूट करताना बिग बी गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. तेव्हा अमिताभ बच्चन यांना श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत असल्यामुळे शुटिंग रद्द करण्यात आली होती. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांची चर्चा सुरु आहे.