‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सूत्रसंचालन करताना अमिताभ बच्चन हे त्यांच्या आयुष्यातील बरेच किस्से प्रेक्षकांना सांगत असतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या लग्नाविषयीचा किस्साही त्यांनी या एपिसोडमध्ये सांगितला. ते म्हणाले, “माझ्या बाबांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. या घटनेनंतर ते मानसिक धक्क्यात होते. ते नैराश्यात गेले होते आणि त्या काळात त्यांनी लिहिलेल्या सर्व कविता अत्यंत भावनिक होत्या. त्या कवितांमधून त्यांचं दु:ख झळकायचं. काही वर्षांनंतर ते कवी संमेलन करू लागले, जेणेकरून काही पैसे मिळतील.”
यावेळी हरिवंशराय बच्चन यांची भेट तेजी यांच्याशी झाली होती. एका मित्राच्या घरी दोघं पहिल्यांदा भेटले होते आणि पहिल्याच भेटीत दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. “वडिलांचे एक मित्र बरेलीमध्ये राहायचे. त्यांनी एकदा वडिलांना भेटायला बोलावलं होतं. माझे वडील त्यांना भेटायला गेले. मित्रमैत्रिणींसोबत डिनर करताना त्यांना कविता वाचून दाखवण्याची विनंती केली. पण बाबा त्यांची कविता वाचून दाखवण्याआधी त्या मित्राने त्यांच्या पत्नीला सांगून तेजी यांना बोलावून घेतलं”, असं त्यांनी सांगितलं.
तेजी किती सुंदर दिसत होत्या आणि त्यादिवशी त्यांनी कोणते कपडे परिधान केले होते, हेसुद्धा हरिवंशराय यांनी बिग बींना अचूक सांगितलं होतं. आईवडिलांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना बिग बी पुढे म्हणाले, “माझ्या आईने अत्यंत शांतपणे त्यांची कविता ऐकली. ‘क्या करू संवेदना लेकर तुम्हारी’ ही कविता त्यांनी वाचून दाखवली होती. ही कविता ऐकल्यानंतर आईच्या डोळ्यात अश्रू होते. त्यानंतर मित्राने तेजी आणि हरिवंशराय यांना त्या खोलीत काही वेळ एकटं सोडलं होतं. थोड्या वेळानंतर वडिलांचे मित्र खोलीत एक हार घेऊन आले आणि त्यांनी तो हार तेजी यांच्या गळ्यात घालायला सांगितलं.”
बिग बींनी सांगितलं की त्याच क्षणी हरिवंशराय यांनी तेजी यांच्याशी लग्न करण्याचं ठरवलं होतं. या दोघांनी 1941 मध्ये लग्न केलं. त्यांना अमिताभ आणि अजिताभ ही दोन मुलं आहेत.