मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान मोठी दुखापत झाली. त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही दुखापत झाली. सेटवर ॲक्शन सीन करताना बिग बींना मार लागला आणि त्यानंतर शूटिंग रद्द करावी लागली. त्यांना तातडीने हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर ते मुंबईतल्या घरी परतले आहेत. मात्र त्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी काही आठवडे लागतील. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याविषयीची माहिती दिली. त्याचसोबत त्यांनी चाहत्यांची माफी मागितली.
हालचाली करताना आणि श्वास घेताना वेदना होत असल्याचं त्यांनी या ब्लॉगमध्ये सांगितलं. त्यामुळे सर्व कामं पुढे ढकलण्यात आली आहेत. सध्या ते जलसा या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या कामांसाठी थोडीफार हालचाल करू शकतोय, असंही त्यांनी नमूद केलंय. हे सर्व सांगताना त्यांनी बंगल्याबाहेर भेटीला येणाऱ्या चाहत्यांची खास माफी मागितली आहे.
‘जलसा गेटजवळ माझी वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मी हे सांगू इच्छितो की माझ्यासाठी हे कठीण असेल किंवा थेट बोलायचं झालं तर मला तुमची भेट घेता येणार नाही. त्यामुळे मी बंगल्याबाहेर तुम्हाला भेटायला येऊ शकणार नाही. जलसा बंगल्याबाहेर माझी भेट घेण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. बाकी सगळं ठीक आहे’, असं ते ब्लॉगमध्ये म्हणाले.
विश्रांती घेत असतानाच मोकळ्या वेळेत वडिलांनी लिहिलेल्या काही गोष्टी वाचत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यापैकी एक परिच्छेदसुद्धा त्यांनी पोस्ट केला आहे. या ब्लॉगच्या शेवटी बिग बी यांनी लिहिलं, ‘जलसा गेटजवळ मला तुमची उपस्थिती जाणवेल पण मी तुम्हाला माझा चेहरा दाखवू शकणार नाही. माफी मागतो.’
अमिताभ बच्चन यांच्या बरगड्यांना मोठी दुखापत झाली आहे. बरगड्यांमधील स्नायूंनाही मार लागला आहे. त्यामुळे त्यांना बरं होण्यासाठी थोडा काळ लागणार आहे. त्यांच्या या ब्लॉगनंतर सोशल मीडियावर चाहते बिग बींच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.