मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : ‘कौन बनेगा करोडपती 15’च्या 26 व्या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी मधुरिमा यांचं हॉटसीटवर स्वागत केलं. त्यांची ओळख करून देताना बिग बी म्हणाले, “मधुरिमा या झारखंडमधल्या रांची इथल्या आहेत. त्या वन, पर्यावरण आणि हवामान बदल विभागात विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मधुरिमा तुमचं पूर्ण नाव काय आहे?” त्यावर उत्तर देताना मधुरिमा म्हणतात, “सर, माझं नाव मधुरिमा आहे. मला माझं नाव फक्त मधुरिमा असंच सांगायचं आहे. सर्वसाधारणपणे वडिलांचं नाव हे आडनाव असतं. लग्नानंतर पतीचं आडनाव आम्हाला जोडलं जातं. किंवा महिलेच्या नावाला ‘देवी’ असा प्रत्यय लावला जातो. मात्र तुम्हाला देवीसारखा आदर मिळत नाही. म्हणून मी आडनावाशी सहमत नाही. मला लग्न झाल्यानंतर पतीने त्यांचं आडनाव जोडणार का असा प्रश्न विचारला. त्यावर मी त्यांना म्हणाले की, माझं नावंच पुरेसं आहे. मला इतर कोणत्याही आडनावाची गरज नाही.”
मधुरिमा यांचं म्हणणं ऐकल्यानंतर बिग बी हसले आणि म्हणाले, “हे खरंच खूप छान आहे. तुमची मतं खूप चांगली आहेत. तुम्ही सांगितलेल्या या परंपरेबद्दल मी तुमचं अभिनंदन करू इच्छितो. मीसुद्धा माझ्या नावाबद्दल असंच काहीसं केलं आहे. माझे वडील हरिवंशराय बच्चन हे जातीव्यवस्थेची बाजू घेणारे नव्हते.” याविषयी पुढे बोलताना बच्चन आडनावामागील रंजक किस्सा ते सांगतात.
“भारतात एखाद्या व्यक्तीच्या आडनावावरून त्याच्या जातीचा अंदाज लावला जातो. माझे वडील कायस्थ कुटुंबातील होते. त्यांनी कवी म्हणून टोपणनाव बच्चन असं ठेवलं आणि नंतर तेच त्यांचं आडनाव बनलं. मी मोठा झाल्यानंतर मला शाळेत दाखल करायचं होतं. तेव्हा माझ्या पालकांना माझं आडनाव विचारण्यात आलं होतं. तेव्हा माझ्या आईवडिलांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काय करायचं असा इशारा केला. नंतर आई वडिलांना म्हणाली, त्याने तुमचंच आडनाव लावलं पाहिजे. अशा प्रकारे मी अमिताभ बच्चन झालो. ही गोष्ट माझ्या वडिलांच्या आत्मचरित्रातही लिहिली आहे”, असं बिग बींनी सांगितलं.
अमिताभ बच्चन पुढे म्हणतात, “मधुरिमा, तुमचे विचार फार कौतुकास्पद आहेत. एखाद्याच्या आडनावावरून आणि जातीवरून प्रश्न उपस्थित केले जातात.” त्यावर मधुरिमा उत्तर देत म्हणतात, “मी तुमच्याशी सहमत आहे सर. लोक विविध गट बनवतात. कामाच्या ठिकाणीही त्यावरून गटबाजी होते.”
बिग बी पुढे म्हणाले, “तुम्हाल जनगणनेविषयी माहिती असेल. लोकांची नावं, वय, उंची, वजन यांची लांबलचक यादी असते. त्यात जातीसाठी एक वेगळा विभाग असतो. मी ते भरलं नव्हतं म्हणून मला माझ्या जातीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी भारतीय असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले की नाही सर, तुम्हाला तुमची जात नमूद करावी लागेल. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी करणार नाही. मला जात नाही. मी भारतीय आहे. आता जर त्यांनी पुन्हा मला त्यावरून प्रश्न विचारला तर मी इतकंच म्हणेन की, मी भारतीय आहे आणि आपलं चांद्रयान चंद्रावर पोहोचलं आहे.” हे ऐकल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.