मुंबई- बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बिग बींना एक्स दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच अभिनेता सलमान खानची सुरक्षाही वाढवली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सलमानला वाय प्लज दर्जाची सुरक्षा देण्यात आली. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांचीसुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बिग बींना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यापूर्वी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे होती.
बिग बी आणि सलमानसोबतच अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या दोघांनाही एक्स दर्जाची सुरक्षा दिली आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांना एक्स दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. या सुरक्षेअंतर्गत दोन सुरक्षा कर्मचारी सोबत असतात (यात कमांडो नाही तर फक्त सशस्त्र पोलीस कर्मचारी असतात). यात एका पीएसओचाही (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) समावेश असतो. अशा प्रकारे तीन पोलीस वेगवेगळ्या शिफ्टमध्ये असतात.
सलमानला मिळालेल्या वाय प्लस सुरक्षेअंतर्गत एक किंवा दोन कमांडो आणि दोन पीएसओ नियुक्त असतात. सलमानच्या सुरक्षेसाठी एकूण 11 जवान त्याच्यासोबत सदैव असतील.
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याच गँगने पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारच्या गुंडांनी सलमानला मुंबईत जीवे मारण्याचा प्लॅन केला होता. या गुंडांनी 2017 मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या वेळी वांद्रे इथल्या घराबाहेर आणि 2018 मध्ये पनवेल फार्महाऊसजवळ त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता.