Amol Kolhe | ‘पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं’; दुखापतीनंतर अमोल कोल्हेंची पोस्ट चर्चेत

| Updated on: May 04, 2023 | 3:56 PM

नाटकाच्या प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांच्या वेषातील डॉ. कोल्हे घोड्यावरुन एण्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली.

Amol Kolhe | पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं; दुखापतीनंतर अमोल कोल्हेंची पोस्ट चर्चेत
Amol Kolhe
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पाठीच्या दुखापतीनंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत हेल्थ अपडेट दिली आहे. अमोल कोल्हे यांनी रुग्णालयातील सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याचसोबत दुखापत फार गंभीर नसल्याचंही म्हटलं आहे. शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगावेळी घोड्यावर बसून एण्ट्री घेत असताना त्यांना दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांचे या महानाट्याचे पुढील सर्व प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

अमोल कोल्हे यांची पोस्ट

‘काळजी करण्याचं कारण नाही. पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं. थोडीशी सक्तीची विश्रांती, परंतु दुखापत फार गंभीर नाही. लवकरच भेटू’, असं लिहित त्यांनी शिवपुत्र संभाजी महानाट्याची पुढील तारीख आणि स्थळाची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लवकराच लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे. ‘सर्वकाही ठीक असेल अशी आशा करते’, अशी कमेंट सुप्रिया सुळे यांनी केली. तर ‘काळजी घे रे, तुला विश्रांती मिळावी म्हणून फोन केला नाही,’ असं सुकन्या मोने यांनी लिहिलंय. अभिनेता निखिल राऊत, हरिष दुधाडे यांनीसुद्धा अमोल कोल्हे यांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली.

नाटकाच्या प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांच्या वेषातील डॉ. कोल्हे घोड्यावरुन एण्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. पाठीत कळ आल्याने त्यांना तात्काळ घोड्यावरून उतरवण्यात आलं होतं. मात्र त्या परिस्थितीतही डॉ. कोल्हे यांनी वेदनाशामक औषधं घेऊन चेहऱ्यावर दुखापतीचा भाव उमटू न देता जिद्दीने प्रयोग सादर केला होता. मात्र डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिल्याने कोल्हे यांचे उर्वरीत प्रयोग रद्द करण्यात आले.