बुलढाणा: ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी रविवारी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि लेखिका-दिग्दर्शिका संध्या गोखलेसुद्धा उपस्थित होत्या. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेच्या महाराष्ट्रातील शेवटच्या दिवशी ते सहभागी झाले. रविवारी रात्री ते मध्यप्रदेशात प्रवेश करतील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर राहुल गांधींसोबत अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
‘देशाप्रती आपली जबाबदारी ओळखून आज प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर हे त्यांच्या पत्नीसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. देशासाठी आवाज उठवल्याबद्दल धन्यवाद’, असं या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
याआधी पूजा भट्ट, रिया सेन, सुशांत सिंग, मोना आंबेगावकर, रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी यांसारखे सेलिब्रिटी या यात्रेत सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रा या काँग्रेस पक्षाच्या उपक्रमाला 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी इथून सुरुवात झाली.
देश के प्रति अपनी ज़िम्मेदारी समझते हुए इसका निर्वहन करने के लिए आज प्रसिद्ध अभिनेता और फिल्म निर्देशक अमोल पालेकर जी अपनी पत्नी के साथ #BharatJodoYatra में शामिल हुए।
देश की आवाज बुलंद करने के लिए आपका धन्यवाद। pic.twitter.com/PrgctA2HkG
— Congress (@INCIndia) November 20, 2022
7 नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमधून राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांसह पदयात्रा केली. ही पदयात्रा पुढे मध्यप्रदेशाच्या दिशेने रवाना होणार आहे.
भारत जोडो यात्रेला या रविवारी 74 दिवस पूर्ण झाले. साईराम अॅग्रो सेंटर इथं रात्री थांबल्यानंतर बुलढाण्यातील भेंडवळ या ठिकाणाहून सकाळी 6 वाजता पुढील यात्रेला सुरुवात झाली.
1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी राहुल गांधी या यात्रेदरम्यान गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. त्याआधी सोमवारचा दिवस विश्रांतीचा असेल.