प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता त्याचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर लाँच करण्यात आला. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, असं या चित्रपटाचं टॅगलाइन आहे. त्यावर आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रत्येकवेळी धर्म, जात यामध्येच अडकून राहणार असेल तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा उत्कर्ष कधी करणार, असा सवाल त्यांनी केला.
“प्रत्येकवेळी धर्म, जात यामध्येच अडकून राहणार असेल तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा उत्कर्ष कधी करणार हा मोठा प्रश्न आहे. दिघे साहेबांचं हिंदुत्व हे व्यापक होतं. ते केवळ जाती-धर्मावर निर्धारित नव्हतं. ‘धर्मवीर पार्ट वन’च्या वेळी ते लोकांच्या भावनांशी खेळले. चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी खोट्या होत्या. खरा पिक्चर अजून यायचा आहे, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं होतं. याचा अर्थ धर्मवीरांशी निगडित असलेल्या माणसांच्या भावनांशी तुम्ही खेळताय. खरे धर्मवीर तुम्ही कधीच दाखवणार नाहीत. धर्मवीर करायचा असेल तर उभं आयुष्य जाईल. या तीन तासाच्या चित्रपटातून धर्मवीर कळणार नाहीत,” अशा शब्दांत केदार दिघे यांनी हल्लाबोल केला.
याविषयी ते पुढे म्हणाले, “दिघे साहेबांच्या सानिध्यात राहिलेल्या सर्वांनाच दिघे साहेब काय होते याची माहिती आहे. त्यामुळे हे जे चित्रपट काढतायेत ते कमर्शियल आहेत. स्वतःचं प्रतिनिधीत्व ते या चित्रपटातून करत आहेत. आपल्याबरोबर निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ते या चित्रपटाचा आधार घेत आहेत. दिघे साहेबांच्या सानिध्यातले सगळे शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. दिघे साहेबांची स्टोरी समजायची असेल तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आणि ग्रामीण भागात जाऊन त्या माणसांना भेटलं पाहिजे.”
चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही टीका केली होती. ‘पक्ष चोरणं हे साहेबांचं हिंदुत्व नाही. साहेबांचं हिंदुत्व काय होतं हे आम्ही सांगणार आहोत. त्याची स्पेशल शिकवणी मिंधे गटाला आम्ही लावणार आहोत. एक चित्रपट काढला गद्दारी करायला आता दुसरा चित्रपट काढत आहेत स्वतःची गद्दारी पचवायला! जितक्या लवकर होईल तितक्या लवकर यांच्यापासून सावध व्हा,’ असं त्यांनी लिहिलं होतं.