जामनगर : 4 मार्च 2024 | सोशल मीडियावर सध्या अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचीच जोरदार चर्चा आहे. 1 मार्च ते 3 मार्चपर्यंत या फंक्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. जामनगरमध्ये अत्यंत भव्य स्वरुपात हा कार्यक्रम पार पडला होता. या प्री-वेडिंगला देश-विदेशातून नामांकित सेलिब्रिटींची उपस्थिती होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतील तमाम स्टार्स अनिल कपूर, सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, सैफ अली खान, करीना कपूरसह इतरही अनेकजण प्री-वेडिंगला हजर होते. हा कार्यक्रम संपताच हे सर्व सेलिब्रिटी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशातच ‘फेसबुक’चे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा पत्नीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झुकरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चान या अनंतच्या हातातील महागडं घड्याळ पाहून थक्क होताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की अनंत हे झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिलासोबत उभं राहून गप्पा मारत असतात. अनंत हे प्रिसिला यांना वनतारा फिरण्याविषयी विचारतात. तिथे फिरण्यासाठी व्यवस्था करण्याविषयी ते बोलत असतात. तेव्हा अचानक प्रिसिला यांची नजर अनंत यांच्या महागड्या घडाळ्यावर जाते. ते घड्याळ त्यांना खूप आवडतं. अनंत यांच्या हातातील घड्याळाची ते प्रशंसा करताना म्हणतात, “हे अत्यंत कमालीचं वॉच आहे. कोणत्या कंपनीने हे वॉच बनवलंय?”
हे ऐकून झुकरबर्ग म्हणतात की प्रिसिला यांना कधीच घडाळ्यांचा शौक नव्हता. परंतु अनंत यांच्या हातातील घड्याळ पाहून त्यांचंही मन बदललं. त्यावर प्रिसिला म्हणतात, “मला कधीच घड्याळ घ्यायचं नव्हतं. परंतु अनंत यांच्या हातातील घड्याळ पाहून माझं मतपरिवर्तन झालंय.” त्यानंतर काही वेळ यावर ते चर्चा करतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘अंबानींसमोर मार्क झुकरबर्ग यांनाही गरीब असल्यासारखं वाटतंय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘पहिल्यांदा इतक्या श्रीमंत व्यक्तींच्या गप्पा ऐकतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘पॉवर ऑफ मोटा भाई’, असंही एका युजरने लिहिलं आहे.
जामनगरच्या प्री-वेडिंगमध्ये झुकरबर्ग यांच्या पत्नीने अनंत अंबानी यांच्या हातातील ज्या घडाळ्याचं इतकं कौतुक केलं, त्याची किंमत वाचून तुमचेही डोळे विस्फारतील. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत यांनी ऑडेमार्स पिगट रॉयल ओकचं खास घड्याळ घातलं होतं. त्याची किंमत जवळपास 14 कोटी रुपये असल्याचं समजतंय.