‘नो एण्ट्री 2’ या चित्रपटावरून निर्माते बोनी कपूर आणि अभिनेते अनिल कपूर या भावंडांमध्ये चांगलाच वाद झाला आहे. ‘नो एण्ट्री 2’मध्ये अनिल कपूर यांना भूमिका न दिल्यामुळे ते नाराज असल्याचा खुलासा खुद्द बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत केला होता. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नो एण्ट्री’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये नव्या कलाकारांची वर्णी लागली आहे. पहिल्या भागात सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मात्र आता सीक्वेलसाठी वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ यांची निवड करण्यात आली आहे. सीक्वेलमध्ये आपली भूमिकाच नाही, हे बाहेरून समजल्यानंतर अनिल कपूर हे भाऊ बोनी कपूर यांच्यावर नाराज झाले. तेव्हापासून माझा भाऊ माझ्याशी बोलत नसल्याचं बोनी कपूर यांनी सांगितलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कपूर यांनी भावासोबतच्या वादावर मौन सोडलं आहे.
‘डीएनए’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अनिल म्हणाले, “घरातली गोष्ट आहे, ती घरातच राहू द्या. त्यावर इथे काय चर्चा करायची?” यानंतर त्यांना बोनी कपूर यांच्या वक्तव्याविषयी सांगण्यात आलं. ते ऐकून अनिल म्हणाले, “हा मग काही फरक पडत नाही. त्या गोष्टीच्या पुढे चला.” ‘नो एण्ट्री 2’बद्दल बोनी कपूर यांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे का, असाही प्रश्न त्यांना पुढे विचारण्यात आला. त्यावर अनिल कपूर यांनी उत्तर दिलं, “हे पहा, घरातल्या गोष्टींवर इथे का चर्चा? आणि तो (बोनी कपूर) कधीच चुकीचा नसतो.”
“आम्ही भावंडं आहोत आणि आमचं एकमेकांवर फार प्रेम आहे. याआधीच्या मुलाखतीत मला विचारलं गेलं की अनिल कपूर यांची प्रतिक्रिया काय होती? तेव्हा मला प्रामाणिकपणे त्यांना सांगावं लागलं की अनिल माझ्याशी बोलत नाहीये. पण मला हेसुद्धा माहित आहे की रक्त हे पाण्यापेक्षा जास्त घट्ट असतं आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळचे आहोत. त्याला दुखावण्याच्या हेतूने मी काही करू शकत नाही. पण हा कामाचा विषय आहे आणि त्यामुळे मला दिग्दर्शकांचं म्हणणं ऐकावंच लागेल. च्यासाठी एखादी भूमिका योग्य असेल तर तोच माझी पहिली पसंत असेल. आमच्यातील नातं पूर्ववत होण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. नाराजीपेक्षा माझ्यासाठी हे नातं फार महत्त्वाचं आहे. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे. पण ठीक आहे. मी त्याला थोडा आणखी वेळ देईन”, असं बोनी कपूर म्हणाले होते.