मुंबई : इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय टीमची अवस्था दयनीय झाली आहे. नाणेफेक जिंकून फिल्डिंग स्वीकारणाऱ्या टीम इंडियाला पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या केवळ तीन विकेट्स घेता आल्या, तर कांगारूंनी 327 धावा केल्या. या सामन्याबद्दल आता एका बॉलिवूड स्टारकिडने केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. हा स्टारकिड टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे निराश झाला आहे. त्याने कॅप्टनपासून टीमच्या निवडीपर्यंत प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘विराट कोहली आता कसोटी कर्णधार नाही, ही भयंकर शोकांतिका आहे’, असं ट्विट या स्टारकिडने केलं आहे. यापुढे त्याने लिहिलंय, ‘विराटशिवाय खेळाडूंमध्ये विजयाची भूक आणि तीव्रता नाही. हे खेळाडू निष्क्रिय झाले आहेत आणि फक्त रोहितच्या नेतृत्वाखाली खेळले जात आहेत. टीम सिलेक्शन अत्यंत वाईट असून अश्विनने खेळायला पाहिजे होतं. याशिवाय बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडणं हा मोठा धक्का आहे.’
Terrible tragedy that @imVkohli isn’t test captain anymore there is no intensity / hunger without him at the helm the players are passive and just going through the motions under Rohit .. poor team selection also Ashwin had to play + Bumrah out through injury is a huge blow
— Harsh Varrdhan Kapoor (@HarshKapoor_) June 7, 2023
टीम इंडियाविषयी ट्विट करणारा हा स्टारकिड अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर आहे. हर्षवर्धन खेळाबाबत अत्यंत जागरूक असतो. तो अनेकदा क्रिकेट आणि फुटबॉलविषयी त्याची मतं सोशल मीडियाद्वारे मांडतो. आर. अश्विन संघात आहे पण प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. संघात कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाने 19 सामन्यांमध्ये 11 विजय, तीन पराभव, पाच अनिर्णितांसह डब्ल्यूटीसी टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. तर भारत 10 विजय, पाच पराभव आणि तीन अनिर्णितांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
हर्षवर्धनविषयी बोलायचं झाल्यास त्याने 2016 मध्ये ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तो 2018 मध्ये ‘भावेश जोसी सुपरहिरो’मध्ये झळकला. त्याने ‘रे’ या अँथॉलॉजीमध्येही काम केलं आहे. यामध्ये त्याने वडील अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला होता. गेल्या काही दिवसांपासून तो अभिनव बिंद्राच्या बायोपिकवर काम करत आहे.