मुंबई : 23 फेब्रुवारी 2024 | बॉलिवूड इंडस्ट्रीत जेव्हा कधी एखाद्या फिट आणि हँडसम अभिनेत्याचा उल्लेख होतो, तेव्हा त्यात अनिल कपूर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. वयाच्या 67 व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. फक्त दिसण्यात आणि पर्सनॅलिटीच्या बाबतीतच नव्हे तर शरीरयष्टीच्या बाबतीतही ते 30-35 वयाच्या अभिनेत्यांनाही मात देतात. त्यामुळे चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की त्यांच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरने वडिलांच्या फिटनेसमागचं रहस्य सांगितलं आहे. फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी अनिल कपूर कशाप्रकारचं लाइफस्टाइल फॉलो करतात, याविषयी तिने सांगितलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनमने तिचे वडील अनिल कपूर आणि काकांच्या लाइफस्टाइलविषयी सांगितलं. वडिलांबद्दल बोलताना ती म्हणाली की अनिल कपूर कधीच दारु पित नाहीत किंवा त्यांना सिगारेटचंही व्यसन नाही. त्यांच्या फिट आणि हँडसम दिसण्यामागचं रहस्य हेच आहे. याशिवाय सोनमने काका बोनी कपूर यांच्या लाइफस्टाइलविषयीही सांगितलं. बोनी कपूर हे प्रचंड फूडी असून त्यांना विविध प्रकारचे पदार्थ चाखायला खूप आवडतं. त्याचसोबत ते कधी कधी ड्रिंक्ससुद्धा करतात, असं ती म्हणाली. दुसरे काका संजय कपूरसुद्धा त्यांच्या फिटनेसविषयी फारच सजग राहतात आणि तेसुद्धा फिटनेस फ्रीक आहेत, असा खुलासा सोनमने यावेळी केला.
अनिल कपूर हे केवळ दारू आणि सिगारेट यांसारख्या व्यसनांपासून दूरच राहत नाहीत तर डाएटची विशेष काळजीसुद्धा घेतात. सोनमने सांगितलं की तिची आई लाइफस्टाइल मेंटेन ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी नियंत्रणात ठेवते. “माझी आई सुनिता कपूर ही नेहमीच आरोग्याविषयी सजग राहिली आहे. पप्पांना कधी कधी चीट-मिल खाणं पसंत आहे, मात्र माझी आई अगदी भारतीय महिलेसाठी आहे. ती त्यांना त्यापासून रोखते आणि त्यांच्या डाएटची सर्वाधिक काळजी तिच घेते”, असं सोनम म्हणाली.
अनिल कपूर हे गेल्या 40 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. स्पॉटबॉय ते अभिनेता बनलेले अनिल कपूर हे सुरुवातीच्या काळात थिएटरबाहेर ब्लॅकमध्ये चित्रपटांची तिकिटं विकायचे. 1971 मध्ये त्यांनी ‘तू पायल मैं गीत’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. पण हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतर 1979 मध्ये ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटात ते सहाय्यक भूमिकेत दिसले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर 1983 मध्ये त्यांना ‘वो सात दिन’ चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली.