बॉलिवूडचा विनोदवीर कपील शर्मा याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये अभिनेता सनी देओल आणि अभिनेता बॉबी देओल यांनी हजेरी लावली होती. दोघांच्या एपिसोडला चाहत्यांनी देखील पसंती दर्शवली आहे. शोमध्ये सनी – बॉबी या दोन भावांमध्ये असलेलं घट्ट नातं देखील प्रेक्षकांना अनुभवता आलं. शिवाय वडील धर्मेंद्र यांच्याबद्दल असलेला आदर देखील दोघांनी शोमध्ये व्यक्त केला. पण एक काळ असा होता, जेव्हा बॉबी देओल आणि धर्मेंद्र यांच्यामध्ये तणावग्रस्त वातावरण होतं. बॉबी वडिलांसोबत बोलायचा देखील नाही. त्यामागे कारण देखील तसं होतं.
बॉबी देओल फक्त 11 वर्षांचा असताना धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला पूर्ण कुटुंबाचा विरोध होता. एका मुलाखतीत खुद्द बॉबी देओल याने हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. सांगायचं झालं तर, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला 44 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अद्यापही धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केलेला नाही.
वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बॉबी देओल म्हणाला होता, ‘तेव्हा मी फक्त 11 वर्षांचा होतो. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला माझा विरोध होता. अनेक वर्ष मी माझ्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करत होतो. ते मला कायम माझ्या आयुष्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत, त्या सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण मी कायम त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.’
‘मी तेव्हा ठरवलं होतं की मी माझ्या वडिलांसोबत कधीच बोलणार नाही. तेव्हा माझं आणि माझ्या वडिलांचं नातं फार वाईट परिस्थितीत होतं…’ सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी देखील हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्यावर नाराजी व्यक्त केली होती.
नुकताच, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले. चाहत्यांनी देखील हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यावर लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला..लग्नानंतर आजपर्यंत कधीच हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या मुख्य घरात प्रवेश केलेला नाही.