मुंबई : 6 जानेवारी 2024 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे. तगडा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटातील सीन्स, डायलॉग्स आणि गाण्यांवर अनेकांनी आक्षेपही घेतला होता. आता हाच चित्रपट त्यातील एका अभिनेत्यामुळे चर्चेत आला आहे. ‘ॲनिमल’मध्ये रणबीरच्या सहकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या मनजोत सिंहचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तो एका मुलीचे प्राण वाचवताना दिसत आहे. मनजोत सिंहने ‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीरच्या चुलत भावाची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याने तुफान हाणामारी केली असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्याने एका मुलीला जीवदान दिलं आहे.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी मनजोत सिंह हा ग्रेटर नोएडामधील शारदा युनिव्हर्सिटीमध्ये बी.टेकचं शिक्षण पूर्ण केलंय. त्याचवेळी त्याने 18 वर्षांच्या तरुणीचा जीव वाचवला होता. हा व्हिडीओ जुना असला तरी ‘ॲनिमल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमुळे तो आता पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की शारदा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून एक मुलगी उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करत असते. पण ऐनवेळी मनजोत तिथे येऊन तिला वाचवतो.
Kudos! to brave #Sikh Manjot Singh Royal R/o Jammu who saved the life of a girl in his Sharda University Greater Noida. The girl was trying to commit suicide by jumping from the building. pic.twitter.com/O05u72FIwl
— ®️aminder (Author Immaculate Thoughts) (@ramindersays) August 4, 2019
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत मनजोतने या घटनेविषयी सांगितलं होतं. “त्या मुलीने सर्वांना धमकी दिली होती की तिच्या जवळ कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर ती दुसऱ्या मजल्यावरून उडी मारेल. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो की नेमकं काय झालंय? कोणी तुला काही बोललं का? तिने सांगितलं की तिचं तिच्या आईशी भांडण झालं होतं. बोलता बोलताच मी तिच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी तिच्या जवळ पोहोचलो तेव्हा तिने इमारतीवरून उडी मारली. सुदैवाने मी तिचा हात पकडू शकलो. त्यानंतर इतर लोकांनी येऊन तिला वर आणण्यात मदत केली”, असं त्याने सांगितलं.
Manjot Singh,23 yo boy doing https://t.co/9mkcPjvFIS saved life of girl who was attempting suicide in Sharda univ.Manjot do part time job as Bhangra coach to pay his fees. A group of sikh leaders promised to pay his coaching fees for civil services exam. pic.twitter.com/BjjhjIbYmA
— Arshdeep (@arsh_kaur7) August 3, 2019
तरुणीचे प्राण वाचवल्यामुळे दिल्ली शीख कम्युनिटीकडून मनजोतचा सन्मानसुद्धा करण्यात आला होता. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन समितीचे माजी अध्यक्ष मंजीत सिंह जीके यांनी मनजोतच्या सिव्हिल सेवा परीक्षेच्या सर्व तयारीचा खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं होतं.
‘ॲनिमल’ या चित्रपटात मनजोतने रणबीर कपूरने साकारलेल्या रणविजयच्या चुलत भावाची भूमिका साकारली आहे. प्रत्येक भांडणात तो त्याच्या भावाची साथ देतो. चित्रपटात मनजोतला फारसा स्क्रीनटाइम मिळालेला नाही. मात्र खऱ्या आयुष्यातील या कामगिरीमुळे नेटकऱ्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे.