मनाली : मुसळधार पावसाने सलग तिसऱ्या दिवशी उत्तर भारताला झोडपून काढलं. या पावसाचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी चार राज्यांमध्ये एनडीआरएफच्या 39 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पावसामुळे शिमला-काल्का महामार्ग बंद झाला आहे. तर फक्त शिमलामध्ये 120 पेक्षा जास्त रस्ते बंद पडले आहेत. या पूरपरिस्थितीत अभिनेत्री अंजना मुमताज यांचा मुलगा रुसलान मुमताज अडकला आहे. रुसलानने मनालीहून इन्स्टा स्टोरीमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. मनालीच्या पुरात तो अडकल्याचं या व्हिडीओत पहायला मिळत आहे. या व्हिडीओत भीषण पूरपरिस्थिती पहायला मिळत असून मागील रस्ताही पाण्यात वाहून गेल्याचं रुसलानने सांगितलं. सध्या सोशल मीडियावर रुसलानचा व्हिडीओ व्हायरल आहे.
रुसलानने 2007 मध्ये ‘मेरा पहला पहला प्यार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तो मनालीला गेला होता. गेल्या पाच दिवसांपासून तो तिथले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत होता. सोशल मीडियावर तो मनालीच्या सौंदर्याविषयी लिहित होता. मात्र पाऊस आणि पुरामुळे तिथली परिस्थिती भयानक झाली आहे.
इन्स्टावर व्हिडीओ शेअर करत रुसलान म्हणाला, “मी कधीच विचार केला नव्हता की मी मनालीत अडकेन. इथे ना नेटवर्क आहे, ना घरी जाण्यासाठी रस्ता, कारण सर्व रस्ते बंद आहेत. मी शूटिंगसुद्धा करू शकत नाही. या सुंदर जागेतील हा अत्यंत कठीण काळ आहे. मला समजत नाहीये की मी खुश व्हायला पाहिजे, दु:खी व्हायला पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे की इथल्या सफरचंदाचा आस्वाद घेतला पाहिजे.”
रुसलानने शेअर केलेल्या इतर काही व्हिडीओमध्ये मनालीतील पूरपरिस्थिची भयाण दृश्ये पहायला मिळत आहेत. आणखी एक क्लिप पोस्ट करत त्याने सांगितलं की कशा पद्धतीने त्याला इतरांसोबत गॅरेजसारख्या एका जागेत थांबावं लागलं आहे. त्याचे हे व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. हिमाचल प्रदेशात गेल्या 50 वर्षांत यंदा प्रथमच सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसात 17 जणांचा मृत्यू तर तीन हजार कोटींची हानी झाली आहे.