मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री अंकिता लोखंडेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवार अंत्यसंस्कार पार पडले. नुकतीच तिने वडिलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट लिहिली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या वडिलांसोबतचे बरेच फोटो पहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत अंकिताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आईवडिलांची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याची संधी तुम्हाला मिळाल्यास ती गमावू नका,’ असंही तिने या पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.
‘बाबा, मी तुमचं वर्णन शब्दांत करू शकत नाही पण मला हे सांगायचं आहे की मी माझ्या संपूर्ण आयुष्यात मी तुमच्याइतकी मजबूत, उत्साही आणि मोहक व्यक्तीमत्त्व असलेली व्यक्ती पाहिली नाही. तुम्ही जेव्हा आम्हाला सोडून गेलात, तेव्हा तुमच्याबद्दल मी बरंच काही जाणू शकले. तुमचा अखेरचा निरोप घेण्यासाठी आलेली प्रत्येक व्यक्ती फक्त तुमची स्तुती करत होती. तुम्ही कशाप्रकारे त्यांना रोज गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवता, त्यांना कॉल करता किंवा एखाद्याची आठवण आल्यास त्याला आवर्जून व्हिडीओ कॉल करता, याबद्दल ते बोलत होते. तुम्ही प्रत्येकाशी असलेलं नातं इतकं जिवंत ठेवलं होतं आणि आता मी पण अशीच का आहे, ते मला समजलं. तुम्ही मला सर्वोत्कृष्ट आयुष्य, उत्तम आठवणी आणि नातेसंबंधांविषयी खूप चांगली समजूत दिली’, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘तुम्ही मला कधीच हार मानायला शिकवलं नाही. राजासारखं कसं जगायचं ते तुम्ही शिकवलंत आणि मला उडण्यासाठी पंख दिले. मी तुम्हाला वचन देते की तुम्ही सदैव माझ्यासोबत राहाल. तुम्ही मला तुमची काळजी घेण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी आणि आई फक्त हाच विचार करतोय की आता आपण रोज उठून नेमकं काय करायचं? कारण तुमच्यामुळे आम्ही सतत जागरूक राहायचो. पप्पांचं जेवण, पप्पांचा नाश्ता.. हे सर्व विचार डोक्यात सतत असायचे. पण आता तुम्ही गेल्यानंतर आमच्याकडे करण्यासारखं असं काहीच उरलं नाही.’
‘आम्हाला अधिकाधिक मजबूत बनवल्याबद्दल धन्यवाद बाबा. तुम्ही फार भाग्यवान होता, त्यामुळे तुम्हाला आईसारखी बायको मिळाली. त्यांनी तुम्हाला सर्वस्व दिलं. तुम्हीसुद्धा त्यांच्यावर भरभरून प्रेम केलंत. मी तुम्हाला वचन देते की आम्ही तिची आधीपेक्षाही अधिक काळजी घेऊ, तिला सर्व आनंद देऊ, तिचे पूर्वीपेक्षाही अधिक लाड करू. तुम्ही दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी आणि मला घडवल्याबद्दल धन्यवाद. मी कायम तुमच्यावर प्रेम करत राहीन’, असं आश्वासन तिने दिवंगत वडिलांना दिलं.
‘आपल्या आयुष्यात आई-वडील खूप महत्त्वाचे असतात. कारण त्यांची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याची संधी तुम्हाला मिळाल्यास ती गमावू नका. एकदा गेलेली व्यक्ती परत कधीच येत नाही. म्हणून त्यांना सर्वस्व द्या, आनंद, वेळ, काळजी, प्रेम..सर्वकाही द्या. त्यांना फक्त हेच हवं असतं’, असा सल्ला तिने चाहत्यांना दिला.