अनु कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘हमारे बारह’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली आहे. हा चित्रपट इस्लामिक श्रद्धा आणि विवाहित मुस्लीम महिलांचा अपमान करणारा असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने जलद निर्णय घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आव्हान देणारी याचिका निकाली निघेपर्यंत त्याचं प्रदर्शन स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. कमल चंद्रा दिग्दर्शित ‘हमारे बारह’ हा चित्रपट उद्या म्हणजेच 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. “आम्ही उच्च न्यायालयाला विनंती करतो की त्यांनी या चित्रपटाशी संबंधित याचिकेबद्दल जलद निर्णय घ्यावा”, असं सर्वोच्च न्यायालय म्हणालं.
‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नकाराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. या याचिकाकर्त्याचं प्रतिनिधीत्व करणारे वकील फौजिया शकील यांनी म्हटलं की, उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी सेन्सॉर बोर्डाला एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र चित्रपट चित्रपट निर्मात्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितलं की टीझरमधून सर्व आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत. हा दावा आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. “आम्ही आज सकाळी टीझर पाहिला आणि त्यात ती सर्व आक्षेपार्ह दृश्ये आहेत”, असं न्यायमूर्तींनी नमूद केलं.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यामुळे निर्मात्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागेल, असा मुद्दा वकिलांनी उपस्थित केला असला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, “जर टीझरच इतका आक्षेपार्ह असेल तर संपूर्ण चित्रपटाचं काय? प्रथमदर्शनी असं दिसतंय की तुम्ही टीझरमधून दृश्ये काढून टाकल्याने स्वत:च अपयशी ठरला आहात.” चित्रपटाच्या सीबीएफसी प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेवर त्वरीत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिले आहेत.
या चित्रपटात अनु कपूर, मनोज जोशी आणि पारितोष त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये महिलांच्या वेदनांचं धाडसी कथन केल्याचं पहायला मिळालं. यामध्ये वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा मांडण्यात आला असून त्यामुळे महिलांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, हे दाखवण्यात आलं होतं. मात्र हाच टीझर काहींना खटकला असून चित्रपटाच्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.