अनुपम खेर आणि महेश भट्ट हे बॉलिवूडचे दोन दिग्गज कलाकार आहेत, जे आपापल्या क्षेत्रातील तज्ञ आहेत. एक पडद्यासमोर आणि दुसरा पडद्यामागून जादू करताना दिसतो. नुकतेच हे दोघे एका मंचावर एकत्र दिसले होते. दोघेही एकमेकांशी बोलत होते आणि हसत होते. पण थोड्यावेळानंतर अचानक असे काही घडले की अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना सर्वांसमोर ‘तुम्ही निघा’ असे म्हटले. त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. आता त्या दोघांमध्ये नेमकं काय झालं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
विक्रम भट्ट लवकरच एका चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. ‘तुमको मेरी कसम’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत चित्रपटाची स्टारकास्ट अनुपम खेर, अदा शर्मा आणि इश्वाक सिंग देखील हजर होते. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांचा अपमान केल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय घडलं?
व्हिडीओमध्ये, स्टेजवर अनुपम खेर, अदा शर्मा, इश्वाक सिंग आणि महेश भट्ट उभे असल्याचे दिसत आहेत. चौघेही समोर असलेल्या फोटोग्राफर्सला पोज देताना दिसत आहेत. पोज देत असताना अनुपम खेर अचानक महेश भट्ट यांना म्हणतात की, ‘भट्ट सर, तुम्ही आता निघा.’ यावर महेश भट थोडे चिडतात आणि म्हणतात, ‘ठीक आहे, मी निघतो.’ त्यानंतर महेश भट्ट लगेच स्टेजवरून खाली उतरतात. अनुपम खेर त्यांना उतरण्यासाठी देखील हात देतात. पण, महेश भट्ट अनुपम खेर यांची कोणतीही मदत घेत नाहीत. महेश भट्ट यांना स्टेजवरून खाली येताना पाहून कोणीतरी विचारले, ‘भट्टसाहेब, तुम्ही निघताय का?’
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट
अनुपम खेर आणि महेश भट्ट यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. व्हिडीओमधील महेश भट्ट यांची स्टाइल पाहून एक गोष्ट स्पष्ट होते की, ते अनुपम खेर यांच्यावर खूप नाराज आहेत. एका यूजरने, ‘अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांच्यासोबत असे वागायला नको होते’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘अनुपम यांनी अगदी योग्य केले’ असे म्हटले आहे. आता त्या दोघांमध्ये नेमकं काय झालं याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.