ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या मुंबईतील कार्यालयात 20 जून रोजी चोरट्यांनी तोडफोड केली. यावेळी चोरांनी तिजोरीतील 4.15 लाख रुपये आणि 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटाचं मूळ निगेटिव्ह चोरलं होतं. घटनेच्या 48 तासांत चोरांना अटक केल्याबद्दल अनुपम यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित पोलिसांचे आभार मानले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी लिहिलं, ‘माझ्या ऑफिसची तोडफोड करणाऱ्या, माझ्या तिजोरीतील पैसे चोरणाऱ्या आणि ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटाचं निगेटिव्ह चोरणाऱ्या दोन्ही चोरांना पकडल्याबद्दल मुंबई पोलिसांचे मनापासून आभार. त्यांनी 48 तासांत ही कारवाई केली असून यातूनच त्यांची कार्यक्षमता सिद्ध होते.’
यापुढील एका पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी चोरांना पकडणाऱ्या पोलिसांच्या टीमचाही फोटो शेअर केला आहे. अनुपम यांनी मुंबई पोलिसांनी घरफोडीबाबत केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यामध्ये लिहिलंय, ‘आझाद नगरमधील घरफोडीच्या तक्रारीची चौकशी करून आंबोली पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी 24 तासांच्या आत दोन संशयितांना शोधून काढलं. तपास पथकाने चोरीची मालमत्तादेखील जप्त केली. यामध्ये चित्रपटाची रिल, रोख रक्कम आणि लोखंडी तिजोरी यांचा समावेश आहे.’
याआधी अनुपम यांनी चोरीचा व्हिडीओ एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केला होता. ‘काल रात्री माझ्या वीरा देसाई रोडवरील ऑफिसमध्ये दोन चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी ऑफिसचे दोन दरवाजे तोडले आणि अकाऊंट्स डिपार्टमेंटमधील संपूर्ण तिजोरी चोरून नेली. कदाचित ते तिजोरी फोडू शकले नव्हते, म्हणून त्यांनी ती संपूर्ण उचलून नेली. आमच्या ऑफिसकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लवकरात लवकर चोर पकडले जातील असं आश्वासन पोलिसांनी दिलंय. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोघंही चोरलेल्या सामानासह ऑटोमध्ये बसलेले दिसत आहेत. ईश्वर त्यांना सदबुद्धी देवो’, असं त्यांनी लिहिलं होतं.