मुंबई- ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यशाच्या शिखरावर आहेत. 1990 मध्ये काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अन्यायावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम यांची आई दुलारी खेर यांनी काश्मीरमध्ये घर बांधण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांची ही इच्छा ऐकून अनुपम खेर यांनी आईला घर बांधून देणार असल्याचं आश्वासन दिलं. आपलं अधुरं स्वप्न मुलगा पूर्ण करणार हे जाणून दुलारी खेर यांना अश्रू अनावर झाले.
‘मंजिलें और भी है’ या ऑनलाइन शोमध्ये अनुपम खेर त्यांच्या आईशी गप्पा मारत होते. मला शिमलामध्ये घर घ्यायला का सांगितलंस, असं अनुपम त्यांच्या आईला विचारतात. त्यावर त्या म्हणतात की, त्यांच्या मित्रमैत्रिणी तिथेच राहतात आणि त्यांचे दिवंगत पती पुष्करनाथ खेर यांनासुद्धा ती जागा खूप आवडायची. मात्र शिमला हा काश्मीरचा भाग असल्याने तिथे आपल्याला कधीच घर घेता येणार नाही, अशी नाराजी त्यांनी पुढे व्यक्त केली. त्याच वेळी अनुपम खेर त्यांना आठवण करून देतात की काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर त्यांना तिथे घर खरेदी करण्याची परवानगी आहे.
मुलाचे हे शब्द ऐकल्यानंतर दुलारी यांना विश्वासच बसत नाही. हे खरंच शक्य आहे का, असा प्रश्न त्या विचारतात. “तिकडे एक बंगला घे. करण नगरमधील तितलीसमोर मला घर बांधायचं आहे. तिथे कुठलं घर विकण्यासाठी आहे का बघ”, असं त्या मुलाला सांगतात.
अनुपम खेर त्यांच्या आईला आश्वासन देतात की ते आता चांगले कमावत आहेत, त्यामुळे ते घर विकत घेऊ शकतात. एक घर शिमल्यात आणि दुसरं काश्मीरमध्ये ठेवू शकतो. काश्मीरमध्ये त्यांच्यासाठी 2BHK घरं पुरेसं आहे, असं त्यांची आई सांगते. ते जेव्हा बोलतात की लवकरच तितलीला फोन करून घराविषयी विचारतो, तेव्हा दुलारी खेर यांच्या डोळ्यात अश्रू येतात. “तू सच कह रहा है (खरं सांगतोय का)?” असं त्या म्हणतात आणि डोळ्यातील अश्रू पुसत मुलाला मिठी मारतात.
90 च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्येचं भयानक वास्तव ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आलं होतं. त्यावेळी असंख्य काश्मिरी पंडितांना त्यांचं घर सोडावं लागलं होतं.