स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी अचानक शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कथेतही लीप पाहिलं गेलं. आता या मालिकेच्या सेटवर नुकतीच अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. 14 नोव्हेंबर रोजी या मालिकेच्या सेटवर काम करताना वीजेचा धक्का लागून विनीत कुमार मंडल नावाच्या क्रू मेंबरचा मृत्यू झाला. 32 वर्षीय विनीत कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करत होता. या घटनेनंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे (AICWA) अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी सेटवर पुरेशा सुरक्षेची खबरदारी न घेतल्याबद्दल मालिकेचे निर्माते आणि चॅनलवर टीका केली.
“अनुपमा या मालिकेचं शूटिंग गेल्या काही वर्षांपासून होतंय. मात्र 14 नोव्हेंबर रोजी या मालिकेच्या सेटवर कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करणाऱ्या विनीत कुमार मंडल नावाच्या 32 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना मालिकेच्या शूटिंगदरम्यान घडली. वाहिनी, निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. पण अशा घटना सेटवर अनेकदा घडत राहतात आणि कामगारांचा विजेचा धक्का लागून किंवा सेटला आग लागल्याने मृत्यू होतो. हे घडण्यामागचं कारण म्हणजे प्रॉडक्शन हाऊस आणि वाहिनी काही पैसे वाचवण्यासाठी सेटवर पुरेशा सुरक्षेची खबरदारी घेत नाहीत”, असा आरोप त्यांनी केला.
याविषयी ते पुढे म्हणाले, “ही लोकं क्रू मेंबर्सना तुच्छ वागणूक देतात. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने मी सरकारी अधिकाऱ्यांना विनंती करतो की अनुपमा या मालिकेचे निर्माते आणि फिल्मसिटीच्या अधिकाऱ्यांवर कामगाराच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर नोंदवावा. फिल्मसिटीच्या सर्व अधिकाऱ्यांनीही सेटवरील निष्काळजीपणाची माहिती आहे. परंतु ते कधीही कारवाई करत नाहीत. त्याचप्रमाणे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी आणि या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी.”
“रात्री साडेनऊ वाजता विजेचा धक्का लागून एका क्रू मेंबरचा मृत्यू होतो. ही दुर्घटना घडल्यानंतरही मालिकेचं शूटिंग थांबवलं नाही आणि मध्यरात्रीपर्यंत ते सुरू ठेवलं होतं. आणखी धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या दिवशीही या मालिकेचं शूटिंग करण्यात आलं होतं. यावरूनच जीवितहानीबद्दल त्यांनी केलेलं स्पष्ट दुर्लक्ष दर्शवित आहे”, असं सुरेश यांनी सांगितलं.