मुंबई : प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचं मंगळवारी इगतपुरी इथल्या एका हॉटेलमध्ये हृदयविकाराने निधन झालं. ते 52 वर्षांचे होते. ‘अनुपमा’ या मालिकेत त्यांनी रुपाली गांगुलीच्या मैत्रिणीच्या पतीची भूमिका साकारली होती. याशिवाय अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला होता. नितेश यांनी दोन लग्न केले होते. त्यांचं पहिलं लग्न एका मराठमोळ्या अभिनेत्रीशी झालं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नितेश यांनी दुसरं लग्न केलं.
नितेश यांची पहिली पत्नी अभिनेत्री अश्विी काळसेकर होती. 1998 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. तर 2002 मध्ये नितेश आणि अश्विनी यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. अश्विनीला घटस्फोट दिल्यानंतर नितेश त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे निघून गेले. टीव्ही अभिनेत्री अर्पिता पांडेवर त्यांचा जीव जडला. ‘जुस्तजू’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. अश्विनीला घटस्फोट दिल्यानंतर एका वर्षाने नितेश यांनी दुसरं लग्न केलं होतं. 2003 मध्ये त्यांनी अर्पिताशी लग्नगाठ बांधली.
नितेश आणि अर्पिता यांना एक मुलगा असून त्याचं नाव आरव असं आहे. नितेश हे त्यांचं खासगी आयुष्य माध्यमांपासून दूर ठेवायचे. सेलिब्रिटी असले तरी सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगण्याला त्यांनी प्राधान्य दिलं होतं. कोणत्याही पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्येही त्यांना फारसं पाहिलं जायचं नाही.
नितेश पांडे हे इगतपुरीतील एका हॉटेलमध्ये कामानिमित्त थांबले होते. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास त्यांच्या खोलीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. नितेश हे कामात असतील म्हणून कर्मचाऱ्याने मध्यरात्री पुन्हा एकदा फोन केला. तेव्हासुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कर्मचाऱ्याला संशय येऊन त्याने हॉटेलच्या मॅनेजरला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतरच मॅनेजरने दुसऱ्या चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता नितेश हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना इगतपुरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हृदयविकाराने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.
नितेश पांडे यांनी ‘बाझी’, ‘मेरे यार की शादी है’, ‘ओम शांती ओम’, ‘खोसला का घोसला’, ‘दबंग 2’, ‘हंटर’, ‘मदारी’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘रंगून’, ‘बधाई दो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय अनेक मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.