मुंबई : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील दोन लोकप्रिय कलाकारांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचं मंगळवारी इगतपुरी इथल्या एका हॉटेलमध्ये हृदयविकाराने निधन झालं. अनुपमा या हिंदी मालिकेत त्यांनी रुपाली गांगुलीच्या मैत्रिणीच्या पतीची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं 22 मे रोजी हिमाचल प्रदेशमध्ये एका अपघातात निधन झालं. साराभाई वर्सेस साराभाई या गाजलेल्या मालिकेतील भूमिकेमुळे वैभवीला लोकप्रियता मिळाली होती. या दोन्ही कलाकारांसोबत अभिनेत्री रुपाली गांगुलीने काम केलं होतं. त्यांना अखेरचा निरोप देताना रुपालीला अश्रू अनावर झाले.
रुपाली बुधवारी नितेश पांडे यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचली होती. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नितेश यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर रुपालीला अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावरील तिचा हा व्हिडीओ अत्यंत भावूक करणारा आहे. वैभवी आणि नितेश हे दोघंही रुपालीच्या अत्यंत जवळचे होते. एकाच दिवशी या दोन्ही कलाकारांना गमावण्याचं दु:ख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट पहायला मिळतंय.
नितेश हे इगतपुरीतील एका हॉटेलमध्ये कामानिमित्त थांबले होते. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास त्यांच्या खोलीस हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. नितेश हे कामात असतील म्हणून कर्मचाऱ्याने मध्यरात्री पुन्हा फोन केला. त्यांच्या मोबाइल फोनवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्याला संशय आला. त्याने हॉटेल मॅनेजरला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर मॅनेजरने दुसऱ्या चावीन खोलीचा दरवाजा उघडला असता नितेश हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हृदयविकाराने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येतंय.
अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं 22 मे रोजी हिमाचल प्रदेश इथं अपघातात निधन झालं. बोरीवली इथल्या स्मशानभूमीत बुधवारी वैभवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिमाचल प्रदेशात कुलू इथं फिरत असताना वैभवीच्या गाडीचा अपघात झाला. अरुंद रस्त्यावरून जात असताना एका वळणावर समोरून आलेल्या ट्रकला जागा करून देण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या अगदी कडेला गाडी थांबवली होती. मात्र बाजूने जाताना ट्रकचा धक्का लागल्याने गाडी दरीत कोसळली. गाडीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या वैभवीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.