अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला मोठा निर्णय

| Updated on: Jan 01, 2025 | 12:43 PM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याची नुकतीच एक मुलाखत तुफान चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर ताशेरे ओढले आहेत. त्याचसोबत मुंबई सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला मोठा निर्णय
Anurag Kashyap
Image Credit source: Instagram
Follow us on

सध्याची बॉलिवूड इंडस्ट्री, चित्रपट निर्माते, टॅलेंट एजन्सी आणि आताच्या कलाकारांच्या कामाची पद्धत यावरून प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने ताशेरे ओढले आहेत. बॉलिवूडमध्ये ‘पुष्पा: द राइज’ किंवा ‘पुष्पा 2: द रुल’ यांसारखे चित्रपट बनवण्याचं कोणाचंच डोकं नाही, असं तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला. अनुरागने ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘देव डी’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘मनमर्जियाँ’ यांसारखे चित्रपट बनवले. हल्लीच्या पिढीतील कलाकारांना अभिनयात कमी आणि लवकरात लवकर स्टार बनण्यात अधिक रस असतो, अशी टीका त्याने केली.

बॉलिवूड दिग्दर्शकांवर टीका

‘हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग म्हणाला, “हिंदी फिल्म इंडस्ट्रीला काहीच समजत नाही. ते ‘पुष्पा’सारखा चित्रपटसुद्धा बनवू शकत नाही. कारण त्यांच्याकडे तेवढं डोकंच नाही. चित्रपटनिर्मिती म्हणजे काय, हेच त्यांना समजत नाही. सुकुमारसारखे दिग्दर्शकच ‘पुष्पा’सारखा चित्रपट बनवू शकतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकांमध्ये गुंतवणूक केली जाते आणि त्यांना चित्रपट बनवण्यास सक्षम केलं जातं. इथे प्रत्येकजण विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना स्वत:चं विश्व तरी माहितीये का आणि त्यात त्यांचं अस्तित्त्व किती लहान आहे हे माहितीये का? हा त्यांचा अहंकार आहे. जेव्हा तुम्ही विश्व निर्माण करता, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हीच देव आहात.”

क्रिएटिव्हीला स्थान नसल्याची तक्रार

याच मुलाखतीत अनुराग कश्यपने स्टुडिओ मॉडेलवर निशाणा साधला. यामुळे क्रिएटिव्हीला स्थान मिळत नसल्याची तक्रार त्याने बोलून दाखवली. यावेळी अनुरागने त्याच्या ‘केनेडी’ या चित्रपटाचं उदाहरण दिलं. ‘कान चित्रपट महोत्सवा’त या चित्रपटाचं खूप कौतुक झालं, मात्र भारतात त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग अद्याप मोकळा झाला नाही. दाक्षिणात्य दिग्दर्शकांचं कौतुक करत तो पुढे म्हणाला, “मला त्यांचा खूप हेवा वाटतो. कारण सध्या मला इथे काही नवीन प्रयोग करायलाच मिळत नाही. इथे पैशांचा प्रश्न आहे. माझे निर्माते आधी नफ्याचा विचार करतात. चित्रपट बनवण्यास सुरुवात होण्यापूर्वीच तो विकला कसा जावा, याचा विचार केला जातोय. यामुळे चित्रपट बनवण्याची मजा निघून जाते.”

हे सुद्धा वाचा

या सर्व कारणांमुळे अनुरागने अक्षरश: मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सोडून दक्षिणेत राहायला जाणार असल्याचा खुलासा त्याने या मुलाखतीत केला.