मुंबई- क्रिकेटर विराट कोहलीच्या हॉटेल रुमचा व्हिडीओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने तीव्र संताप व्यक्त केला आहे. विराट सध्या टी- 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात आहे. सोशल मीडियावर लीक झालेल्या या व्हिडीओमध्ये त्याच्या हॉटेलच्या खोलीत सूटमध्ये कोणीतरी फेरफटका मारत सर्व गोष्टी दाखवताना दिसत आहे. विराटचं सर्व सामान या व्हिडीओत स्पष्ट पहायला मिळत आहे. खासगी गोष्टी अशा पद्धतीने सार्वजनिक केल्याबद्दल विराट आणि अनुष्काने संताप व्यक्त केला आहे.
अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ‘काही घटना याआधीही अनुभवल्या आहेत, ज्यामध्ये काही चाहत्यांनी कोणतीही दया किंवा विनम्रता दाखवली नाही. परंतु ही खरोखर सर्वांत वाईट गोष्ट आहे. हे एका व्यक्तीच्या खासगी आयुष्याचा अपमान आणि त्याच्या अधिकारांचं उल्लंघन आहे. हे पाहून जर कोणी असा विचार करत असेल की सेलिब्रिटी आहे तर या गोष्टींचा सामना करावा लागेल, तर तुम्हीदेखील या समस्येचा एक भाग आहात.’
‘काही प्रमाणात आत्मनियंत्रण प्रत्येकाने करावं. तसंच जर हे तुमच्या बेडरुममध्ये होत असेल तर मर्यादेची सीमा कुठे आहे?’, असा सवाल अनुष्काने उपस्थित केला आहे.
काही पापाराझींनी त्यांच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असता बऱ्याच चाहत्यांनी तो डिलिट करण्याची विनंती केली. काही नेटकऱ्यांनी संबंधित हॉटेलवर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. ‘सेलिब्रिटी असो किंवा सामान्य व्यक्ती.. हे एखाद्याच्या खासगी आयुष्याच्या अधिकारांचं उल्लंघन आहे’, अशा शब्दांत चाहत्यांनी आवाज उठवला.
विराटनेही व्हायरल व्हिडीओवर राग व्यक्त करत लिहिलं, ‘मी समजू शकतो की चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पहायचं असलं, भेटायचं असतं आणि नेहमीच मी त्याचं कौतुक करतो. परंतु हा व्हिडीओ अत्यंत भयंकर आहे. आता मला माझ्याच खासगी आयुष्याविषयी चिंता वाटू लागली आहे. जर मला माझ्याच हॉटेलच्या रुममध्ये प्रायव्हसी मिळत नसेल तर मी इतर कुठेही कसली अपेक्षा करू शकतो? मी या घटनेच्या विरोधात आहे. कृपया लोकांच्या खासगी आयुष्याचा आदर करा. त्यांना स्वत:च्या मनोरंजनाची वस्तू मानू नका.’