मुलगा अकाय कोहलीच्या जन्मानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्सदरम्यान होणारा आयपीएलचा सामना पाहण्यासाठी ती बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचली होती. अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका फोटोने चाहत्यांचं खास लक्ष वेधलं आहे. या फोटोमध्ये विराट कोहली अनुष्काला फ्लाइंग किस देताना दिसतोय. संपूर्ण मॅचदरम्यान अनुष्काच्या चेहऱ्यावरील विविध हावभाव कॅमेरावर प्रेक्षकांना पहायला मिळत होते. तिच्या चेहऱ्यावर कधी आश्चर्यचकीत तर कधी समाधानाचे भाव दिसले. विशेष म्हणजे अनुष्काची उपस्थिती ही विराट आणि त्याच्या टीमसाठी ‘लकी’ ठरल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. कारण RCB ने गुजरात टायटन्सविरुद्धचा हा सामना चार विकेट्सने जिंकला होता.
मुलाला जन्म दिल्यानंतर अनुष्का कुठेच दिसली नव्हती. त्यामुळे मॅचदरम्यान तिची उपस्थिती विशेष चर्चेत होती. या मॅचच्या आधी तिने विराट आणि RCB च्या खेळाडूंसोबत तिचा वाढदिवस साजरा केला होता. विराटनेही अनुष्काबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली होती. ‘तू मला भेटली नसती तर मी स्वत:च कुठेतरी हरवून गेलो असतो. तू माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस’, अशा शब्दांत विराटने प्रेम व्यक्त केलं होतं. अनुष्का आणि विराटने 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2021 मध्ये अनुष्काने मुलीला जन्म दिला. तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. 15 फेब्रुवारी रोजी अनुष्काने मुलाला जन्म दिला. वामिका आणि अकाय अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत.
अनुष्काने लंडनमध्ये अकायला जन्म दिला. या दुसऱ्या गरोदरपणाबद्दल त्यांनी बरेच दिवस मौन बाळगलं होतं. अकायच्या जन्मानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. त्यानंतरही अनुष्का आणि विराट काही दिवस परदेशातच होते. परदेशातून आल्यानंतर अनुष्काने पहिल्यांदा मॅचला हजेरी लावली होती.