अभिनेत्री अनुष्का शर्माने ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिचा दुसरा चित्रपट ‘बँड बाजा बारात’ हा होता. यामध्ये तिने अभिनेता रणवीर सिंहसोबत काम केलं होतं. चित्रपटातील या दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. इतकंच नव्हे तर त्यादरम्यान अनुष्का आणि रणवीरच्या डेटिंगच्याही चर्चा होत्या. मात्र या चर्चा दोघांनीही फेटाळल्या होत्या. या चित्रपटाच्या काही वर्षांनंतर रणवीर हा अभिनेत्री दीपिका पादुकोणला डेट करू लागला होता. त्यावेळी काही कारणास्तव दीपिका आणि अनुष्का यांच्यात ‘कॅट-फाइट’ झाल्याचं म्हटलं जातं. यावर खुद्द अनुष्काने प्रतिक्रिया दिली होती.
दीपिकासोबतच्या वादाबद्दल अनुष्का म्हणाली होती, “फिल्म इंडस्ट्रीत नेहमीच महिलांना अशा पद्धतीने पाहणं चुकीचं आहे. मला दीपिका किंवा इतर कोणत्याही अभिनेत्रीशी कोणतीच समस्या नाही. मी इथे फक्त काम करायला आले आहे, भांडणं नाही. मी जे काम करतेय, त्यात मी खुश आहे आणि तीसुद्धा तिच्या आयुष्यात खुश असेल. आमच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या सर्व चर्चा खोट्या आहेत. फक्त एक खोटी कथा बनवली जाते आणि आमच्याबद्दल गॉसिप करण्यासाठी ती पसरवली जाते. मुळात इंडस्ट्रीतील महिलांकडे ज्या पद्धतीने पाहिलं जातं, तेच चुकीचं आहे.”
अनुष्काने क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केलं. मुलगी वामिकाच्या जन्मानंतर ती चित्रपटांमध्ये झळकली नाही. मात्र मुलीच्या जन्मानंतर काही वर्षांनी ती ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अनुष्काने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. विराट आणि अनुष्काच्या मुलाचं नाव अकाय असं आहे. विराट आणि अनुष्काने 2017 मध्ये लग्न केलं. तर त्याच्या दुसऱ्याच वर्षी 2018 मध्ये दीपिका आणि रणवीरने लग्न केलं. अनुष्का आणि रणवीरने 2015 मध्ये ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केलं होतं.
दुसरीकडे दीपिका लवकरच आई बनणार आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. गरोदरपणात दीपिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करतेय.