मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्यावर गेल्या महिन्यात दु:खाचा डोंगर कोसळला. अपूर्वाच्या भावाचं वयाच्या 28 व्या वर्षी निधन झालं. गेल्या महिन्यात अपूर्वाचा धाकटा भाऊ ओमकार नेमळेकरचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं होतं. आता महिनाभरानंतर पहिल्यांदाच तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. ‘तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण गोष्ट आहे. तुला निरोप द्यायला मी तयार नव्हते, मी तुला सोडायला तयार नव्हते’, अशी भावूक पोस्ट अपूर्वाने लिहिली आहे.
‘माझा प्रिय भाऊ, तुझ्या आत्म्याला शांती मिळो. आयुष्यात काही गोष्टी गमवाव्या लागतात. गमावलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही. तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण गोष्ट आहे. मी तुला निरोप द्यायला तयार नव्हते, तुला सोडायला तयार नव्हते. तुझ्यासोबत आणखी एक दिवस, एक सेकंद मिळावा यासाठी मी काहीही करायला तयार होते. पण तुझ्यामुळे मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले. कारण प्रेम कधीच मरत नाही. आज तू इथे प्रत्यक्षात नसलास तरी तुझं हृदय माझ्यासोबत आहे. ते कायम माझ्या मनात राहील. स्थळ आणि वेळ या गोष्टींपलीकडे आपण पुन्हा कधीतरी भेटू. तू माझ्यासोबत अजूनही आहेस, या विचाराने मी जगेन. मी तुझ्यावर तेव्हासुद्धा प्रेम करायचे आणि आतासुद्धा तितकंच करते. भविष्यातही मी तुझ्यावर खूप प्रेम करेन. तुला लवकरच भेटीन. तुझ्या आत्म्याला शांती मिळो’, अशी पोस्ट अपूर्वाने लिहिली आहे. अपूर्वाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
अपूर्वाने इन्स्टा स्टोरीमध्येही भावासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ‘तुला जाऊन आज महिना झाला आहे. तुझी खूप आठवण येतेय भाई’, असं तिने या फोटोवर लिहिलं आहे.