AR Rahman | घराणेशाहीवर ए. आर. रेहमान यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले “माझ्याच मुलांनी हे पुढे नेलं नाही तर..”

| Updated on: Aug 11, 2023 | 2:24 PM

ए. आर. रेहमान यांची मुलगी खतिजा रेहमान हिने मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटातील काही गाणी गायली आहेत. गेल्या वर्षी तिने रियासदीन शेख मोहम्मदशी निकाह केला. तर त्यांचा मुलगा ए. आर. अमीन याने 'दिल बेचारा' चित्रपटातील एक गाणं गायलं आहे.

AR Rahman | घराणेशाहीवर ए. आर. रेहमान यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले माझ्याच मुलांनी हे पुढे नेलं नाही तर..
AR Rahman
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : जगविख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत घराणेशाहीबद्दल मोकळेपणे वक्तव्य केलं. ए. आर. रेहमान यांना खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुलं आहेत. माझ्या मुलांनी जर माझा वारसा पुढे नेला नाही तर हा संपूर्ण सेटअप गोदामात रुपांतर होईल, असं ते म्हणाले. कलाविश्वातील घराणेशाहीचा मुद्दा नेहमीच वादाचा विषय ठरला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला होता. इंडस्ट्रीत स्टारकिड्सना अधिक संधी दिल्या जात असल्याचा आरोप काही कलाकारांकडून झाला होता.

घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोलताना ए. आर. रेहमान म्हणाले, “आजकाल लोकांनी ही नवीन संकल्पना शिकली आहे.. घराणेशाही. मी स्वत:च्या बळावर या सर्व गोष्टी उभारल्या आहेत, हे माझं संपूर्ण विश्व आहे. जर माझी मुलं या क्षेत्रात काम करत नसती किंवा त्यांनी माझा वारसा पुढे नेला नाही तर हे सर्व फक्त गोदाम बनून राहील. माझ्या स्टुडिओमधील प्रत्येक भिंतीचा एकेक इंच, एकेक खुर्ची अत्यंत काळजीपूर्वक आणि आवडीने निवडली गेली आहे. माझ्या मुलांनी भविष्यात हाच वारसा पुढे न्यावा अशी माझी इच्छा आहे.”

हे सुद्धा वाचा

ए. आर. रेहमान यांची मुलगी खतिजा रेहमान हिने मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटातील काही गाणी गायली आहेत. गेल्या वर्षी तिने रियासदीन शेख मोहम्मदशी निकाह केला. तर त्यांचा मुलगा ए. आर. अमीन याने ‘दिल बेचारा’ चित्रपटातील एक गाणं गायलं आहे. याशिवाय ‘मामन्नान’ या तमिळ चित्रपटातही त्याने गाणं गायलं आहे.

“एका गोष्टीबद्दल मी खूप स्पष्ट होतो की मी जो काही पैसा ज्यांच्यासाठी सोडून जाणार आहे, तो जर हुशार नसेल आणि त्याला वारसा पुढे नेता आला नाही तर सर्वकाही एका दिवसात मातीमोल होईल. माझ्या आई आणि बहिणींसोबत मी असंख्य आर्थिक समस्यांचा सामना केला आहे. त्यांच्यासोबत केलेल्या या संघर्षामुळे आज मी ए. आर. रेहमान आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

जुन्या आठवणींबद्दल ए. आर. रेहमान यांनी सांगितलं, “आजही मला संघर्षाच्या दिवसांतील अनुभव विनम्रतेने निर्णय घेण्यास मदत करतात. त्यामुळे माझ्या मुलांना या सर्व गोष्टींची जाणीव असावी, असा माझा प्रयत्न असतो. त्यांच्यापासून मी कोणतीच वाईट गोष्ट किंवा समस्या लपवत नाही. इमारतीसाठी जर मी एखादा लोन घेतला किंवा काही गहाणं ठेवलं तरी मी त्यांना त्याची माहिती देतो. हे त्यांना त्रास देण्यासाठी नव्हे तर फक्त शिकण्यासाठी सांगत असतो.”