अभिनेता अरबाज खानचं दुसरं लग्न हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला होता. बहीण अर्पिता खानच्या घरातच हा निकाह पार पडला होता. आता लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे, याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. “मी खूप खुश आहे. पत्नीला ओळखू लागल्यापासून मी बराच शांत आणि एकाग्र झालोय”, असं तो म्हणाला. शुराला डेट करत असल्यापासून आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि हा बदल सकारात्मकच होता, असं अरबाजने सांगितलं. ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुराची भेट झाली होती. शुरा ही अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीची मेकअप आर्टिस्ट आहे. शुराला भेटल्यापासून मी स्वत:विषयी अधिक आत्मविश्वासू झालोय, असंही अरबाज या मुलाखतीत म्हणाला.
शुराशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना अरबाज म्हणाला, “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही फार एकमेकांशी बोललो नाही. पण शूटिंग संपल्यानंतरच्या पार्टीत आम्ही एकमेकांशी बोलले. त्यानंतर हळूहळू संपर्क वाढला. आमच्यात बरंच काही साम्य आहे. एकमेकांशी भेटून, बोलून आमच्यात प्रेमाची भावना निर्माण झाली. आम्ही दोघं आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर होतो, जिथे आम्हाला पार्टनरसोबत स्थिर व्हायचं होतं. एकमेकांमध्ये अनेक भावना गुंतल्याने अखेर आम्ही पुढील आयुष्य सोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे संपूर्ण आमच्यासाठी ‘झट मंगनी पट ब्याह’ असं होतं.”
अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. या दोघांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर अरबाज आणि शुराला अनेकदा बाहेर फिरताना आणि इतर कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. सार्वजनिक ठिकाणी शुरा नेहमीच फोटोग्राफर्स किंवा पापाराझींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करते. कॅमेरासमोर ती कम्फर्टेबल नाही, हे सहज दिसून येतं.
याआधीच्या एका मुलाखतीत अरबाज म्हणाला, “लोकांना याबद्दल आश्चर्य वाटू शकतं, पण लग्नापूर्वी आम्ही वर्षभरापेक्षा अधिक काळ एकमेकांना डेट केलंय. आम्ही आमच्या नात्याबद्दल ठाम होतो. आम्ही दोघं खूप नशीबवान होतो. आम्ही बाहेर कॉफी शॉपवर भेटायचो आणि जेव्हा मी तिला घरी घ्यायला किंवा सोडायचो जायचो, तेव्हा आम्हाला कोणीच पाहायचे नाही. कोणतेच पापाराझी तिचे फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करत नसल्याचा तिला खूप आनंद होता. आता आम्ही कॉफी शॉपवर जाण्याआधीच तिथे पापाराझी पोहोचलेले असतात.”