अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान याने नुकताच ‘डंब बिर्याणी’ नावाने पॉडकास्ट सुरू केला आहे. या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये अरबाज आणि त्याचा भाऊ सोहैल खान यांची हजेरी लावली. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये अरहानची आई आणि अरबाजची पूर्व पत्नी मलायका पाहुणी म्हणून पोहोचली. यावेळी मुलामध्ये आलेल्या वडिलांच्या गुणांविषयी बोलताना मलायकाने अरबाजचा नावडत्या गुणाविषयी सांगितलं होतं. “तू सुद्धा तुझ्या वडिलांप्रमाणेच निर्णय घेण्यात खूप वेळ घालवतो. कोणतीही गोष्ट तू पटकन ठरवत नाहीस” असं ती म्हणाली होती. त्यावर आता अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे.
‘झूम एंटरटेन्मेंट’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, “हे पहा, ती एका आई आणि मुलामधील गोष्ट होती. ते मत तिचं होतं. मला वाटतं की तिला तसं मत मांडण्याचा हक्क आहे. होय, काही गोष्टींच्या बाबतीत मी निर्णयक्षम नसल्याचं तिला वाटू शकलं असेल. पण तिने माझ्याबद्दल फक्त इतकंच म्हटलं नव्हतं. माझ्या विचारांमध्ये खूप स्पष्टता असते, मी खूप स्पष्ट असतो, असंही तिने माझ्याबद्दल म्हटल्याचं मी एका मुलाखतीत वाचलं होतं. त्यामुळे मी ती सकारात्मक गोष्ट मानतो. याबद्दल काहीच गांभीर्याने घेण्याची गरज नाही.”
“मुलामध्ये आणि त्याच्या आईमध्ये फारच रंजक गप्पा चालल्या होत्या. मी निर्णयक्षम नसल्याचं बोलण्याचा हक्क तिला आहे. माझ्यामते ते ठीक आहे. त्यावरून मला काही वाद घालायचा नाही. ते तिचं मत आहे”, असं अरबाज पुढे म्हणाला.
पॉडकास्टमध्ये अरहान आई मलायकाला प्रश्न विचारतो. “माझ्यात वडिलांसारखे असे कोणते सकारात्मक आणि नकारात्मक गुण आहेत”, असं तो विचारतो. त्यावर उत्तर देताना मलायका म्हणते, “तुझी चालण्या-बोलण्याची पद्धत आणि व्यवहार अगदी तुझ्या वडिलांसारखेच आहेत. तुम्ही दोघं इतके समान आहात, की कधीकधी मीच थक्क होते. या काही आकर्षक सवयी नाहीत, पण ते अगदी अरबाजसारखे आहेत. त्याचप्रमाणे तो काही गोष्टींबाबत खूप स्पष्ट विचार करतो. ते गुणसुद्धा तुझ्यात आहे. पण त्याचवेळी तू सुद्धा त्याच्यासारखा लगेच निर्णय घेत नाहीस. हा गुण मला अजिबात आवडत नाही. तू तुझ्या शर्टाचा रंगसुद्धा लगेच निवडत नाहीस, काय खायचं ते लगेच ठरवत नाहीस, सकाळी कितीला उठायचं हे तू ठरवत नाहीत. या गोष्टी वडिलांसारख्याच आहेत.”