अभिनेता सलमान खानची त्याच्या आईवडिलांशी आणि भावंडांशी फार जवळीक आहे. आनंदाचा किंवा संकटाचा क्षण असो.. सलमान, अरबाज आणि सोहैल हे तिघे भाऊ नेहमी एकमेकांसोबत असतात. काही दिवसांपूर्वीच सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला. त्यानंतर अरबाज लगेचच भावाच्या भेटीसाठी गेला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाज सलमानसोबत असलेल्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. या दोघांनी ‘दबंग’ आणि ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. चित्रपटांविषयी आणि एकमेकांच्या खासगी आयुष्यात काय चाललंय, याविषयी आमच्यात चर्चा होत असते, असं अरबाजने सांगितलं. पण खासगी आयुष्यातील अनेक लहान-सहान गोष्टी आम्ही एकमेकांना सांगत बसत नाही, असं त्याने स्पष्ट केलं.
‘बॉलिवूड बबल’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, “खान कुटुंबात प्रत्येकाला एकमेकांच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याविषयी प्रत्येक गोष्ट माहीत असेल असं लोकांना वाटतं. पण असं काहीच नाही. आम्ही एकत्र राहतो पण सलमानला माझ्याविषयी किंवा मला सलमानविषयी प्रत्येक गोष्ट माहीत असेलच असं नाही. किंबहुना आम्हाला तेवढं एकमेकांबद्दल जाणून घेणं गरजेचंही वाटत नाही. जरी तो तुमचा सख्खा भाऊ असला तरी त्याचं खासगी आयुष्य हे खासगीच असावं. त्याचे व्यावसायिक आणि आर्थिक निर्णय हे त्याचेच असावेत.”
भावंडांमध्ये किंवा कुटुंबीयांमध्येही एका मर्यादेचं पालन होणं आवश्यक असल्याचं त्याने नमूद केलं. “अर्थातच जेव्हा आमच्यापैकी कोणालाही मदतीची गरज असते, मग ती भावनिक, व्यावसायिक, आर्थिक कोणतीही मदत असो.. आम्ही लगेच धावून जातो. जो व्यक्ती जी मदत करू शकेल, ती आम्ही करतो. याचसाठी कुटुंब असतं. एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी कुटुंब असतं. पण आम्ही स्वत:ला एकमेकांवर लादत नाही. तो माझा भाऊ आहे म्हणून त्याने माझ्यासाठी अमूक गोष्टी केल्याच पाहिजेत अशा अपेक्षा आम्ही एकमेकांकडून ठेवत नाही”, असं त्याने सांगितलं.
कोणताही प्रोजेक्ट हाती घेतला तर त्याचा फायदा भावालाही झाला पाहिजे, या हेतून एकत्र काम करत असल्याचं अरबाज म्हणाला. “दबंगसारखा एखादा प्रोजेक्ट असेल तर त्यातून निर्माता म्हणून केवळ माझाच फायदा झाला पाहिजे असं नाही. तर त्यातून सलमानचाही फायदा झाला पाहिजे, याचा आम्ही विचार करतो”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.