मुंबई : 12 मार्च 2024 | बॉलिवूड इंडस्ट्रीत गेल्या काही वर्षांत घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच गाजला. अनेक कलाकारांनी यावर आपली बाजू मांडली. फक्त बॉलिवूडच नाही तर प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही असते, असं काहींनी म्हटलं. तर काहींनी त्याचा तीव्र विरोध केला. अशातच अरबाज खान आणि सोहैल खान या दोघं भावंडांनी यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे दोघं मोकळेपणे व्यक्त झाले. एखाद्या अभिनेत्याचं श्रेय त्याच्या कुटुंबीयांना देणं किती चुकीचं आहे, असं ते म्हणाले. सलीम खान यांचा मुलगा आणि सलमान खानचा भाऊ असल्याच्या नात्याने या दोघांना तेवढं यश मिळालं नाही. मात्र निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात ते नशीब आजमावत आहेत.
या मुलाखतीत अरबाज म्हणाला, “जर तुमचे वडील बॉलिवूड इंडस्ट्रीतच नाही तर दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात असले तरी तुमच्यासाठी ते काही दरवाजे नक्की उघडण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला तिथे काम करण्याची संधी मिळू शकते. वकिलाचा मुलगा वकील, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर.. तसंच अभिनेत्याचा किंवा फिल्म इंडस्ट्रीतल्या कलाकाराचा मुलगा त्याच क्षेत्रात कामासाठी येऊ शकतो. तुम्हाला त्या क्षेत्रातील लोकांची ओळख करून दिली जाईल. पण ती लोकं तुम्हाला काम देतीलच याची खात्री नसते.”
“तुम्हाला पहिल्या संधीसाठी मदत मिळू शकते. पण याने तुमचं करिअर बनू शकत नाही. सोहैल आणि मी याप्रकरणात आमचा भाऊ सलमानइतकंच यशस्वी होऊ शकलो नाही. पण आम्ही अजूनही इथेच आहोत आणि काम करतोय. प्रत्येक जण दुसऱ्या व्यक्तीवर उपकार करत नाही. तुम्ही बॉलिवूडच्या कोणत्या दिग्गजांचे नातेवाईक आहात, याने काही फरक पडत नाही. जर तुमच्या अभिनयावर प्रेक्षक खुश नसतील किंवा तुम्हाला पुन्हा पाहायची त्यांची इच्छा नसेल तर कोणीच तुम्हाला भूमिका ऑफर करणार नाही. त्यामुळे घराणेशाही किंवा कनेक्शनमुळे एखाद्याला यश मिळतं, हे बोलणं चुकीचं ठरेल. कारण सुपरस्टार अभिनेत्यांचेही १०-१० चित्रपट फ्लॉप होतात. अशावेळी त्यांनाही समजत नाही की काय करावं?”, असं तो पुढे म्हणाला.
बॉलिवूड इंडस्ट्रीत काही मुलांना आणि भावंडांना घराणेशाहीमुळे यश मिळालं. पण असेही अनेक आहेत, ज्यांना घराणेशाहीचाही काही फायदा झाला नाही, असंही अरबाजने नमूद केलं.