मुंबई: अभिनेत्री अर्चना पुरण सिंगला (Archana Puran Singh) प्रेक्षक सातत्याने कॉमेडी शोजमध्ये पाहत असले तरी तिने तिच्या करिअरमध्ये बऱ्याच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अर्चनाने मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. ‘जलवा’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘मोहब्बतें’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. टेलिव्हिजनवरही अर्चना यशस्वी ठरली. ‘श्रीमान श्रीमती’, ‘जाने भी दो पारो’, ‘जुनून’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं. मात्र गेल्या काही काळापासून ती ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी सर्कस’सारख्या कॉमेडी शोजमध्येच दिसली. त्यामुळे कॉमेडीशिवाय (Comedy) दुसऱ्या कोणत्याच भूमिका मिळत नसल्याची खंत तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत अर्चना म्हणाली, “माझ्या भूमिकांची छापच एकदम पक्की होती. म्हणून कुछ कुछ होता है या चित्रपटातील मिस ब्रिगेंझाच्या भूमिकेनंतर मला कोणती ऑफर द्यावी हे लोकांना कळतच नव्हतं. तो चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास 25 वर्षे झाली आहेत. पण आजही ती भूमिका माझी पाठ सोडत नाहीये.”
“मी फक्त कॉमेडीच खूप चांगलं करू शकते, असं लोकांना वाटतं. त्यामुळे एक कलाकार म्हणून मला चांगल्या कामाला मुकल्यासारखं, फसवणूक झाल्यासारखं वाटतं. चांगल्या भूमिकांसाठी मी अक्षरश: तडफडतेय”, अशी खंत तिने व्यक्त केली.
“जर तुम्हाला एकाच प्रकारच्या भूमिका मिळत गेल्या, तर तुम्ही खूप नशिबवान आहात असं अनेकजण म्हणतात. लोकांना तुम्हाला सतत पाहण्याची इच्छा असते, असं ते सांगतात. पण माझ्या मते, तो एका अभिनेत्याचा मृत्यूच आहे. मला आठवतंय, एकदा नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित कामाची मागणी केली होती. मीसुद्धा या संधीचा उपयोग त्यासाठी करू इच्छिते. दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडे मी कामाची मागणी करते”, असंही ती पुढे म्हणाली.
कॉमेडीव्यतिरिक्त इतर भूमिका साकारण्यासाठी आतूर असल्याचं त्यांनी सांगितलं. “एक कलाकार म्हणून मी परफॉर्म करण्यासाठी तडफडतेय. लोकांनी माझ्या कलेची फक्त एकच बाजू पाहिली आहे. माझी गंभीर बाजूसुद्धा आहे. कॉमेडीशिवाय मी बरंच काही करू शकते. मी रडूही शकते, लोकांना रडवूही शकते. माझ्या कलेची ती बाजू लोकांसमोर आलीच नाही. पण मला आशा आहे की एक दिवस ते नक्कीच लोकांसमोर येईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.