कोलकाता : प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगच्या आवाजातील ‘दिलवाले’ या चित्रपटातील ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ हे गाणं चांगलंच गाजलं होतं. शाहरुख आणि काजोलवर चित्रित झालेलं हे गाणं सोशल मीडियावरील ट्रेंड बनला होता. मात्र त्यानंतर ‘पठाण’ या चित्रपटात जेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घातली, तेव्हा त्यावरून खूप मोठा वाद निर्माण झाला. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (KIFF 2022) ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत अरिजीतने गेरूआ या गाण्याची एक ओळ गायली होती. त्यानंतर काही दिवसांनी 18 फेब्रुवारीला होणारा अरिजीतचा कॉन्सर्ट पोलिसांनी परवागनी नाकारल्यानंतर रद्द करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं. यामुळे भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात राजकीय खलबतं सुरू झाली. आता नुकतंच कोलकाता कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना अरिजीतने पहिल्यांदाच ‘गेरूआ’ वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
अरिजीतने रविवारी रात्री कोलकाता इथं सुमारे चार तास लाइव्ह परफॉर्म केलं. यावेळी तो ‘रंग दे तू मोहे गेरूआ’ हे गाणंसुद्धा गायला. या गाण्याशी संबंधित वादावर तो पुढे म्हणाला, “एका रंगावरून इतका वाद! भगवा हा संन्यासींचा, स्वामीजींचा (विवेकानंद) रंग आहे. त्यांनी पांढरा रंग परिधान केला असता तर त्यावरूनही वाद झाला असता का?”
टीएमसी आमदार तापस रॉय हे अरिजीतच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “गेरूआ रंगावरून कोणताच वाद नव्हता. हा रंग आपल्या तिरंग्याचा एक भाग आहे. भाजप नेहमी प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करते. कोणत्या कार्यक्रमाला शहरात परवानगी मिळावी की नाही, याचा निर्णय आमचा पक्ष नाही तर प्रशासन घेते. भाजपला फक्त टीएमसी आणि ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बोलायचं असतं.”
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटाला ‘बेशर्म रंग’ गाण्यामुळे विरोधाचा सामना करावा लागला होता. या गाण्यातील एका दृश्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. त्यावरूनच विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या होत्या. मध्यप्रदेशचे मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीसुद्धा गाण्यावर आक्षेप घेतला होता.